परभणीतील गंगाखेड तालुक्यातील अकोली येथील घटना
परभणी/गंगाखेड : शेतात काम करून दुपारी जेवण करत असतांना अचानक विज पडल्यामुळे घाबरून बेशुद्ध पडलेल्या २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यु झाल्याची घटना सोमवार २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विवाहितेसोबत अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील अकोली येथील प्रियंका नामदेव पोले वय २३ वर्ष या सोमवार २१ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सासू सोबत शेतात गेल्या होत्या. शेतात काम करून दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास प्रियंका पोले व त्यांच्या सासू झाडाखाली बसून जेवण करत असतांना अचानक विज पडल्याने प्रियंका पोले घाबरून बेशुद्ध झाल्या. त्याचवेळी प्रियंका पोले यांचे पती नामदेव पोले व नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत दुपारी १:४६ वाजता त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना घुगे, परिचारिका प्रमिला पुट्टेवाड, माला घोबाळे, संगिता केंद्रे यांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी मनोहर बिडगर यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शेतात काम करतांना विवाहितेसोबत अचानक घडलेल्या या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







