‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अकोला : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची महाराष्ट्राला वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होत नव्हती. महाराष्ट्र लुटण्यासाठीच भाजपने मविआ सरकार पाडले, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. बाळापूर येथे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मविआचे पदाधिकारी उपस्थित होते. चुकीच्या माणसाला मोठं केलं. ही सडलेली माणसे मला नको होती. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चौफेर टीका केली.

मविआ सरकारमध्ये सगळी मोठी खाती गद्दारांना दिली होती. त्यांनी ओरबडले आणि चोरी उघडकीस येणार, हे लक्षात येताच पळून गेले. मुख्यमंत्री पदाचा मोह कधी नव्हताच. क्षणात वर्षा बंगला सोडला. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू होते आणि गद्दारांच्या हातात ग्लास होते, अशी टीका ठाकरे यांनी केली.

भाजपने पाठीत खंजीर खुपसला. भाजपसोबत राहिलो असतो तर त्यांनी मोदी, शहांच्या मागे फिरवले असते. सडलेली मानसिकता आहे. करोना काळात देखील महाराष्ट्राचा विकास सुरू होता. हे त्यांना खुपत होते. भाजपने गद्दारी करून हिंदुत्व संपवले. खरा भाजप आता राहिला नाही. सर्व उपरे व लुटारू बसले आहेत. शिवसेनेने भाजपला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र फिरवला. तोच आता शेवटचा खांदा भाजपला देणार आहे. सगळे भ्रष्टाचारी एकत्र आणावे आणि भाजप वाढवावा, हे त्यांचे हिंदुत्व. आमचे हिंदुत्व घर पेटवणारे नाही, तर घरातील चूल पेटवणारे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पक्षाचे नाव, चिन्ह चोरले, ते दरोडेखोर आहेत. निवडणुकीनंतर ते शेती करायला जातील.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!