
अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल १६० उमेदवार रिंगणात असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे.
सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या. यात कार्नर सभा, मोटारसायकल रॅली, ऑटोरिक्षा रॅली, पदयात्रा आणि मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. तर काही उमेदवारांनी महिला शक्तीचे प्रदर्शन करून ‘लाडकी बहीण’ आपल्याच पाठीशी असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
अमरावती, बडनेरा, दर्यापूर, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी व मेळघाट या आठही मतदारसंघांत सायंकाळी ६ वाजता प्रचाराचे भोंगे थांबले. गत १५ दिवसांपासून सुरू असलेली किलबिल बंद झाल्याचा अनुभव मतदारांना आला. एकंदरीत रॅली, पदयात्रांद्वारे उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन हे ‘सुपर मंडे’ ठरले, हे विशेष. आता एक दिवस छुप्या प्रचारावर भर दिला जाणार आहे.
अमरावती : अमरावती मतदारसंघात एकूण २२ उमेदवार रिंगणात आहे. महायुतीच्या सुलभा खोडके, महाविकास आघाडीत उद्धवसेनेचे डॉ. सुनील देशमुख, मनसचे पप्पू पाटील, भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता या चार उमेदवारांमध्ये लढतीचे चित्र आहे. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोटरसायकल रॅली, पदयात्रांची धूम होती. उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठीही मोठ्या प्रमाणात घेतल्याचे दिसून आले.
अचलपूर : अचलपूर मतदारसंघ हा राज्यात ‘हॉट सिट ठरला आहे. प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे बबलू देशमुख, भाजपचे प्रवीण तायडे या प्रमुखांसह २२ उमेदवार मैदानात आहेत. बच्चू कडू हे पाचव्यांदा रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे. काँग्रेसचे बबलू देशमुखांनी विजयश्री खेचून आणण्यासाठी रणनीती आखली आहे. आज गाव-खेड्यात प्रचार रॅली, सभा, प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या.
तिवसा : काँग्रेसच्या फायर बँन्ड नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी अचलपुरातून ‘हॅटट्रिक’ साधली आहे. आता चौथ्यांदा त्या निवडणुकीच्या सामोरे जात आहे. ठाकूर यांच्या विजयाची घोडदौड रोखण्यासाठी भाजपने राजेश वानखडे यांना मैदानात उतरवले आहे. अचलपूर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. एकूण १६ उमेदवार रिंगणात असले तरी ठाकूर आणि वानखडे यांच्यात लढत आहे.
बडनेरा : बडनेरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे रवी राणा, अपक्ष उमेदवार प्रीती बंड, महाविकास आघाडीचे सुनील खराटे, भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार भारतीय या प्रमुखांसह एकूण २६ उमेदवार मैदानात आहेत. ऑटोरिक्षा रॅलींसह महिलांची पदयात्रा लक्षवेधी ठरली. दुचाकी रॅलीने मतदारसंघ दणाणून सोडला. उमेदवारांनी निवडणूक चिन्ह आणि विकासाचे व्हिजन मतदारांच्या पुढ्यात ठेवले.
दर्यापूर :दर्यापूर मतदारसंघ हा अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहे. महायुतीत बंडखोरी झाल्यामुळे भाजप-शिंदेसेनेत ताणतणाव कायम आहे. शिंदेसेनेचे कॅप्टन अभिजित अडसूळ, उद्धव सेनेचे गजानन लवटे तर भाजपचे बंडखोर रमेश बुंदिले यांची युवा स्वाभिमानपार्टीकडून उमेदवारी आहे. मतदार संघात दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या दोन शहरांसह ग्रामीण भाग आहे. एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत.
मोर्शी : मोर्शी मतदारसंघ हा संत्रा आणि कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे, मविआचे गिरीश कराळे तर भाजपचे चंदू यावलकर, अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार या चार उमेदवारांसह १९ जण रिंगणात कायम आहे. स्थानिक आणि सहकार क्षेत्राच्या राजकारणाचा निवडणुकीत मोठा प्रभाव आहे. सोमवारी सभा, पदयात्रा, भेटीगाठी, रॅलीद्वारे उमेदवारांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
मेळघाट :मेळघाट मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल, भाजपचे केवलराम काळे, काँग्रेसचे डॉ. हेमंत चिमोटे या प्रमुख तीन उमेदवारांसह एकूण १५ जण मैदानात आहेत. आजी-माजी आमदारांमध्ये मेळघाटचा ‘किंग’ होण्यासाठी स्पर्धा दिसून येते. प्रचारात मोटारसायकल रॅली, सभा, दऱ्या-खोऱ्यातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींना पसंती दिली.
धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे मतदारसंघात तिहेरी लढत दिसून येत आहे. भाजपचे प्रताप अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात थेट लढत होणार आहे. ‘वंचित’चे नीलेश विश्वकर्मा यांच्यासह २४ उमेदवार रिंगणात आहे. या मतदारसंघात ग्रामीण क्षेत्राचा भाग मोठा आहे. प्रचाराच्या अंतिम दिवशी पदयात्रा, मोटारसायकल रॅली, मतदारांच्या भेटीगाठी, गाव-खेड्यात संवादावर भर देण्यात आला. महापुरुषांना वंदन, देवदर्शनही घेतले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







