
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार ) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी हल्ला झाला. अनिल देशमुख नरखेड येथील सांगता सभा आटपून काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना रात्री ८ च्या सुमारास त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या घडनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्ष विशेषतः भाजपने घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे.काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेले अनिल देशमुख उपचारानंतर आज रुग्णालयातून घरी परतले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीला आव्हान दिले. ते म्हणाले, भाजपच्या लोकांनी दगड मारले किंवा गोळ्या झाडल्या तरी अनिल देशमुख मरणार नाही. त्यांना पुरून उरणार आहे आणि त्यांना सोडणार देखील नाही, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला होणे निंदनीय आहे. भाजपला स्टंटबाजी वाटत असेल तर चौकशी करून सत्य समोर आणावे, असे आव्हान काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी भाजपला दिले.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये बसलेल्या अनिल देशमुखांचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत थेट फडणवीसांना सवाल केला आहे. “गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खुनी हल्ला झाला. फडणवीस, आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. शेम! शेम! असे राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावरून या घटनेचा निषेध केला आहे.
देशमुख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध. राज्यात कायदा व सुव्यवस्था केवळ कागदावर राहिली आहे. ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या गाडीवर असे जीवघेणे हल्ले होत असतील तर राज्य खरंच जंगलराजकडे वळला आहे, हे आता सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राने अशी विकृती कधीच पाहिली नव्हती. विशेषत: नागपुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप सपशेल झाली असून गुन्हेगारांना येथे बळ मिळाले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन आरोपींना लवकरात लवकर गजाआड करावे अशी आमची मागणी आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







