
संतोष मोरे – खालापूर / रायगड खोपोली _-(प्रतिनिधी )_- खोपोली शिळफाटा येथिल मित ओसवाल नामक अल्पवयीन मुलाला रिक्षाची धडक बसून काल मृत्यू पावल्याने आज संपूर्ण खोपोली करांच्या वतीने साश्रू नयनानी त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.
खोपोली शीळफाटा येथे राहणाऱ्या ओसवाल परिवारातील सर्वांचा लाडका असणारा मित हा तसा भक्तिमार्गकडे कल असलेला अल्पवईन तरुण. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेले असताना आईने मोठ्या कष्टाने वाढविलेला हा मुलगा.
जैन साधूंचे पनवेल येथून खोपोली कडे प्रस्थान होत असताना परवा रात्री साधूंचा चौक परिसरात मुक्काम होता. मित ओसवाल आणि त्याचा मित्र हे दोघे जैन साधू यांची सेवा करण्यासाठी चौक येथे गेले होते. काल सकाळी चौक वरून खोपोली कडे जैन साधू आणि त्यांचे भक्तगण पायी निघाले असता नवी मुंबई येथून आलेल्या रिक्षा चालक महेंद्र निकम याचा ताबा रिक्षावरून सुटला आणि तो थेट साधूंच्या ताफयात घुसला. रिक्षाची धडक इतकी प्रचंड होती कि मित याच्या डोक्याला प्रचंड दुखापत झाली आणि चौक ग्रामीण रुग्णालयात नेताना उपचारा पूर्वीच मित याचा मृत्यू झाला.
मित याच्या मृत्यूची बातमी समजताच सर्व बांधव यांनी चौक रुग्णालयात धाव घेतली. आज संपूर्ण खोपोली बाजार पेठ, शीळफाटा बाजार पेठ पूर्ण बंद ठेवण्यात आली. सकाळी दहा वाजता जैन धर्मानुसार मित ओसवाल याचे पार्थिव पालखीत सजवून वाजता गाजत गुलाल उधळत नेऊन त्यास अंतिम अग्नी देऊन साश्रू नयनानी अखेरचा निरोप देण्यात आला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






