रब्बी हंगामाची 96 टक्के पेरणी; सिंचनाच्या सुविधेने वाढले क्षेत्र
अमरावती : जिल्ह्यात रब्बी हंगामात आतार्यंत सरासरी 1 लाख 47 हजार 896 हेक्टरच्या तुलनेत 1 लाख 41 हजार 780 म्हणजे 96 टक्के क्षेत्रात रब्बीची पेरणी आटोपली आहे. गत काही वर्षात जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी सुविधा वाढल्याने रब्बी हंगामातील क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. पूर्वी पुरेशा सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकरी एकच पीक घेत होते; मात्र आता वर्षातून दोन किंवा तीन पिके घेतली जातात.
रब्बी हंगामात पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा पिकाला दिली आहे. त्यामुळे यंदा हरभरा पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अमरावती, दर्यापूर या बाजारसमित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल होते. रब्बी हंगामात दुबार पीक घेण्याची पध्दत आहे. विहीर, बोअरवेल यासारख्या सिंचन सुविधांचा पर्याय शेतकऱ्यांनी उपलब्ध करून घेतला आहे. परिणामी, क्षेत्रवाढ नोंदविली गेली असल्याचे कृषीविभागाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 3 हजार 679 हेक्टर असून आतापर्यंत 98 हजार 86 हेक्टर म्हणजे 95 टक्के क्षेत्रात हरभरा पिकांची, तर सरासरी 42 हजार 233 हेक्टरच्या तुलनेत 40 हजार 263 हेक्टर म्हणजे 96 टक्के क्षेत्रात गव्हाचा पेरा झाला आहे. सूर्यफूल, करडई, जवस या तेलबियांचे क्षेत्र नाममात्र आहे.
दर्यापूर बाजारसमितीमध्ये रब्बी हंगामातील हरभऱ्यांची मोठी आवक होते. दर्यापूर तालुका हा खारपाण पट्टयामध्ये समाविष्ट आहे. या भागातील हरभऱ्याला त्याच कारणामुळे वेगळी चव येत असल्याने उत्तर भारतातून याला सर्वाधिक मागणी राहते. दिल्ली बाजारपेठेत खारपाण पट्टयातील हरभरा म्हणून व्यापारी यास अधिकचा दर देतात, असे सांगण्यात येते.
अमरावती जिल्ह्यात सोयी अधिक असल्याने दुर्गम मेळघाटासह सर्वदूर हरभरा लागवड होते. विदर्भातील 11 जिल्हह्यांमध्ये रब्बी हंगामातील हरभऱ्यांची सर्वाधिक आवक अमरावती बाजारसमितीमध्ये होते. त्यामुळे हरभरा उलाढालीचे मोठे केंद्र नजीकच्या काळात हीच बाजारसमिती झाली आहे. पंजाब, हरियाना, दिल्ली, राजस्थान तसेच उत्तर प्रदेशासह देशभरात मागणी असलेल्या राज्यांमध्ये या ठिकाणावरून हरभरा पाठविला जातो.
गव्हाच्या पेरणीवर भर
रब्बी ज्वारी, सुर्यफूल, करडई, मक्यासाठी अत्यल्प क्षेत्र प्रस्तावित आहे. चांगली थंडी पडल्यानंतर गहू पिकाची पेरणी होते. दिवाळीपासून थंडीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीवर भर दिला. त्यानुसार, आतापर्यंत 40 हजार 263 हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. जमिनीत ओलावा असताना रब्बी पेरणी फायद्याची ठरते, शेतकऱ्यांनी ही संधी साधल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी लागवड क्षेत्र वाढले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






