
अमरावती प्रतिनिधी अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) चे व्यवस्थापन जुलै २०२५ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (जीएमसी) सोपवले जाणार आहे. त्यामुळे त्यानंतरचे सर्व अधिकारही जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्याकडे सोपवले जाणार असून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एकूणच संचालनाबाबत त्यांचा शब्द अंतिम ठरणार आहे.
या नव्या बदलामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांचे कार्यक्षेत्र घटणार असून त्यांच्याकडून इर्विनचा भार पूर्णतः कमी केला जाणार आहे. त्यामुळे जुलैपासून पुढे त्यांचे कार्यालय इर्विनमध्ये राहणार असले तरी त्यांना केवळ जिल्हाभरातील चार उपजिल्हा रुग्णालये, तालुका तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालये आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा क्षय रुग्णालय यांच्या संचालनावरच लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्ह्यात मोर्शी, तिवसा, अचलपूर आणि धारणी या चार ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये आहेत. इतर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत.
सध्या या सर्व रुग्णालयांचे व्यवस्थापन जिल्हा शल्यचिकित्सकांना सांभाळावे लागते. जुलैनंतर यापैकी जिल्हा सामान्य रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्याकडून जीएमसीच्या अधिकाराकडे हस्तांतरित केली.
जाईल. अमरावती शहरात २०२४- २५ या शैक्षणिक सत्रापासून जीएमसी सुरू झाले. हे महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेली इर्विनची इमारत, डफरीनचा काही भाग आणि सुपर स्पेशालिटीच्या काही इमारती सात वर्षांसाठी जीएमसीला दिल्या आहेत. तसा भाडे कराररही वैद्यकीय शिक्षण विभागाशी केला. त्यामुळे या इमारतींवर एका अर्थाने जीएमसीचा हक्क आहे. त्या अनुषंगाने गरजेनुसार बदलही केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण आणि तेथील संपूर्ण यंत्रणा जीएमसीच्या ताब्यात आल्यानंतर जीएमसीद्वारे गरजेनुसार योग्य ते बदल केले जाणार आहेत. सध्या एक नवा कक्ष त्याठिकाणी उभारला जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांचे कार्यालय सुद्धा इर्विनच्या बाहेर गजानन बाबा मंदिराच्या मागील जागेत स्थानांतरित केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






