
अमरावती :एखाद्या बाळाच्या पोटात गर्भ वाढणे हे दुर्मीळ, पण एकाच वेळी दोन गर्भ ही अतिशय दुर्मीळ घटना आहे. जगाच्या इतिहासात आतापर्यंत अशा केवळ ३३ नोंदी आहेत. त्यामुळे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात
झालेली शस्त्रक्रिया ही ३४ वी असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांनी सांगितले. त्यांनीच यापूर्वी २००१ मध्ये नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पहिली शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी पाच महिन्याच्या बाळाच्या पोटातून अर्भक काढल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
बुलढाण्याहून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आणलेल्या बाळावर मंगळवारी शस्त्रक्रिया करून दोन्हीही मृत अर्भक काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनात बालरोगतज्ज्ञ डॉ. उषा गजभिये, डॉ. नवीन चौधरी, डॉ. निलेश पाचबुद्धे, डॉ. नितीन बरडिया, भूलतज्ज्ञ डॉ. संजय महतपुरे यांनी केली.
एकाच बीजांडापासून झालेली ती जुळी डॉ. उषा गजभिये म्हणाल्या, खरं तर हे दोन गर्भ म्हणजे एकाच बीजांडापासून जन्माला येणारी जुळी बाळं. परंतु, काही कारणाने ती आईच्या गर्भात स्वतंत्रपणे न वाढता एका बाळाच्या शरीरात दुसरा गर्भ वाढू लागतो. बहुतांश प्रकरणात एकच गर्भआढळतो. नागपूर येथे अशा प्रकारची एक शस्त्रक्रिया केली होती. एका बाळाच्या पोटात दोन गर्भ ही दुर्मीळ घटना आहे.
तीन वर्षांपर्यंत विशेष काळजी तीन दिवसांच्या बाळाच्या पोटातून काढलेल्या दोन्ही अर्भकांचे वजन हे तीनशे ग्रॅमच्या जवळपास होते. धडाविना शरीर या दोन्ही अर्भकांमध्ये तयार झाले होते. ही शस्त्रक्रिया जटिल होती, पण आता बाळ सुखरूप आहे. तथापि, तीन वर्षांपर्यंत त्याची रक्त चाचणी तसेच सोनोग्राफी तपासणी सातत्याने करावी लागणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






