
अमरावती : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे. त्याची धास्ती जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांनी घेतली असून, आतापर्यंत १४ लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज करत लाभ नाकारला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून पात्र महिलांना महिना १५०० रुपये दिले. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा सरकारचा या योजेनेमागील उद्देश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख २० हजार ६३६ महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी ७लाख ८ हजार १८७ महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत, तर २० हजार २९३ अर्ज बाद झाले आहेत. १६७३ अर्ज तात्पुरते बाद झाले असून, ४१८७ अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यात आतापर्यंत जिल्ह्यातील १४ लाडक्या बहिणींनी स्वतःहून योजनेचा लाभनाकारत असल्याचे अर्ज केले आहेत. आता पुन्हा अजून किती महिला यासाठी पुढाकार घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






