
अमरावती : एटीएम कार्डची अदलाबदल करून एका निवृत्त अधिकाऱ्याला ४० हजार रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना २ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दस्तुरनगर येथील एटीएम सेंटरमध्ये घडली. याप्रकरणी, श्रीराम नथ्थुजी बोरस (८५, वैभव कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
निवृत्त अधिकारी असलेले श्रीराम बोरस (८५) हे दस्तुरनगर चौकातील एटीएम सेंटरवर पैसे काढण्याकरिता गेले होते. प्रक्रिया पूर्ण केल्यावरही पैसे निघाले नाही. त्यावेळी तेथे उपस्थित एकाने मशीनमधून बोरस यांचे कार्ड काढले. मात्र, त्याने त्यांचे कार्ड न देता दुसरेच कार्ड दिले. त्यानंतर तो तेथून निघून गेला. यादरम्यान श्रीराम बोरस यांनी पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना ‘राँग पिन’ असा मेसेज प्राप्त झाला. त्यामुळे त्या अनोळखी भामट्याने कार्डची अदलाबदल केल्याचा संशय बोरस यांना आला.
टप्प्याटप्याने काढले पैसे, आले मेसेज घरी गेल्यावर एटीएम कार्डद्वारे त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ४० हजार रुपये काढण्यात आल्याचे मेसेजवरून त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बोरस यांनी तातडीने बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यातून यशोदानगर येथील एटीएम सेंटरवरून ४० हजार रुपये काढण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. एटीएम कार्डची अदलाबदल करून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






