
अमरावती : मी तुझ्यावर प्रेम करतो.तूदेखील माझ्यावर प्रेम कर, अशी जबरदस्ती करीत मी तुला जगू देणार नाही, अशी गर्भीत धमकी एका तरुणीला देण्यात आली. वरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी २ मे रोजी दुपारी १२:३०च्या सुमारास ही घटना घडली. अवचित घडलेल्या त्या प्रकाराने ती घाबरली. मात्र, तेवढ्याच हिमतीने तिने पोलिस ठाणे गाठले. त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली.
वरूड पोलिसांनी याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून २ मे रोजी सायंकाळी आरोपी अयाजखान शफीखान (३०, रा. देशमुखपुरा, वरूड) याच्याविरुद्ध विनयभंग, धमकी, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.
तालुक्यातील रहिवासी असलेली ती तरुणी २ मे रोजी दुपारी कॉलेज संपवून पायी घराकडे जात असताना आरोपी अयाजखान हा अचानक तिच्यासमोर दुचाकीसह उभा राहिला. दुचाकी तिच्यासमोर लावून माझ्या गाडीवर बस, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे, अशी बतावणी त्याने केली. तिने नकार दिला असता, मी तुझ्यावर प्रेम करतो, तूही माझ्यावर प्रेम कर, असा तो बरळला. त्यावरही तिने ठामपणे नकार दिला असता, आरोपीने तिच्या गालावर थप्पड लगावली तथा मी तुला जगू देणार नाही, अशी धमकी दिली. तिचा विनयभंग केला. तरुणीने तत्काळ घर गाठले. झालेली घटना कुटुंबीयांच्या कानावर घातली. त्यांनी तिला धीर देत सायंकाळी वरूड पोलिस ठाणे गाठले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






