कारवाईचा बडगा : चोर माहुली येथील शिवशाही बस जळीत प्रकरण
अमरावती : यवतमाळ मार्गावरील चोर माहुली गावानजिकच्या कोठोडा फाट्याजवळ शिवशाही बसच्या इंजिनच्या बोनटने अचानक पेट घेतला होता. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाली होती. दरम्यान प्रकरणाच्या चौकशीअंती हलगर्जीपणाचा ठपका ठेवत येथील एसटी महामंडळाच्या सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. ही निलंबन कारवाई एसटी महामंडळाचे धाव विभागाचे उपअधीक्षक प्रवीण अंबुलकर आणि विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी २६ मार्च रोजी केली आहे. निलंबित केलेल्या मध्ये पाळी प्रमुख राहुल बेलोकार, हरिओम इंगोले, प्रभाकर नाजूकराव राणे, यांत्रिकी विभागाचे सहायक कार्यशाळा अधीक्षक हर्षल धारणे, बसचालक विनोद ढोलवाडे व वाहक भाग्यश्री अलटकर आदी कर्मचाऱ्यावर निलंबन कारवाई केल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. २२ मार्च रोजी अमरावती आगार क्रमांक १ ची शिवशाही बस क्रमांक एमएच ०६ बीडब्यू ०२९४ ही येथून यवतमाळकडे जात असतांना कोठोडा फाट्याजवळ बसला आग लागली होती. चालक, वाहकांनी समयसूचकता दाखवित प्रवाशांना तत्काळ बस खाली उतरविले होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





