अमरावतीला ‘शिवाई’ ई-बसची हुलकावणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात गतवर्षापासून प्रदूषणविरहित, पर्यावरणपूरक वातानुकूलित ‘शिवाई’ ई-बस आली आहे. सध्या या बस नागपूर, चंद्रपूर या शहरात धावत आहेत. एसटी महामंडळाच्या अमरावती विभागालाही ६८ ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. या पार्श्वभूमीवर तपोवन येथील एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये चार्जिंग स्टेशन तयार झाले आहेत. परंतु, या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी अमरावतीला मात्र वारंवार हुलकावणी दिली जात आहे. परिणामी, इलेक्ट्रिक बसेस धावण्याचा मुहूर्त वर्षभरापासून निघाला नाही. सध्या कडाक्याचे ऊन तापत असताना अमरावतीकरांना वातानुकूलित ‘शिवाई ई-बसेची प्रतीक्षा लागली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात अमरावतीसह नागपूर, चंद्रपूर या विभागांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत होते.

 

तपोवन वर्कशॉपमध्ये १७ चार्जर युनिट सज्ज एसटीच्या ताफ्यात दिवाळीच्या मुहूर्तावर ई-बस दाखल होणार आहेत. याकरिता अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाचे चार्जिंग स्टेशन तपोवन येथील एसटीच्या वर्कशॉपमध्ये १७ चार्जर युनिट बसविले आहेत. आतापर्यंत नागपूर व चंद्रपूर येथील एसटी महामंडळाच्या ताफ्यात ‘शिवाई’ ई-बस दाखल होऊन प्रवासी सेवेत धावत आहेत. मात्र, जिल्ह्यातील प्रवाशांना कडक उन्हात वातानुकूलित ‘शिवाई’ ई-बसची प्रतीक्षा आहे.

 

विभागात एसटी महामंडळाने ६८ इलेक्ट्रिक बसची मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात १५ ते २० बस मिळणार आहेत. या अनुषंगाने तपोवन वर्कशॉप येथील चार्जिंग स्टेशनचे बांधकामासह वीजजोडणी तयार आहे. त्यामुळे लवकरच ई -बसेससाठी पाठपुरावा सुरू आहे.

नीलेश बेलसरे,विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

 

ई-बस सर्व सुविधांनीयुक्त अत्याधुनिक अशा ६८ बसेसच्या मागणीचा प्रस्ताव अमरावती विभागाने दिला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १० बस एसटीच्या ताफ्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याची प्रतीक्षा होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013541
error: Content is protected !!