शहरात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
अचलपूर : परतवाडा-अचलपूर मार्गात दर्गासमोर मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे. अचलपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील गळतीमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील बहुतांश भागात पाणीटंचाई निर्माण होत असताना जलवाहिनीला २४ तासांपासून गळती लागली. सर्वत्र पाण्याची समस्या असताना लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शहरातील रहदारीच्या प्रमुख मार्गावरून वाहणाऱ्या या जलवाहिनीला गळती लागल्याने या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर शुद्ध पाणी नाल्यात वाहून जात आहे. रस्त्याच्या मधोमध पाण्याचे बुडबुडे निघत आहेत. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. ही पाण्याची गळती लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बुंदेलपुरा भागात टँकरने पाणीपुरवठा दुसरीकडे, नगर परिषद क्षेत्रातील बुंदेलपुरा, माळवेशपुरा, सराईपुरा, अन्वरपुरा, हिरापुरा, मुकेरीपुरा या भागांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत नळातून कमी दाबाचा व अतिशय कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





