शिरखेड व खल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना, दोन्ही प्रकरणांतील आरोपींना तत्काळ अटक, पोलिसांची यशस्वी कामगिरी
काटपूर येथे डोक्यावर दगडाने प्रहार करून खून
नेरपिंगळाई : शिरखेड पोलिसठाण्याच्या हद्दीतील काटपूर ममदापूर येथे काठीने मारहाण करून जखमी केल्यानंतर ३५ वर्षीय युवकाला डोक्यावर दगडाचे प्रहार करून संपविण्यात आले. दारूच्या पैशांच्या वादातून शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाने हे कृत्य केले. शिरखेड पोलिसांनी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून त्याला अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, राहुल रामदास इंगळे (३५) असे मृत मजुराचे नाव आहे. त्याला मद्यपानाचे व्यसन होते. तो आईसमवेत राहत होता. आठ वर्षांपूर्वी त्याची पत्नी विभक्त झाली होती. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. शंकर पंजाबराव डोंगरे (६०) असे शेजारीच राहणाऱ्या खुन्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी शंकरने गोठा जाळला, त्यात आईची साडी जळाली व एक बकरी ठार झाली. त्यावेळी शंकरकडील दारूच्या पावट्या त्याने चोरल्या. हा वाद या शेजाऱ्यांमध्ये धुमसत होता. त्यावरून १३ मे रोजी रात्री ९ नंतर घराबाहेर पडलेल्या राहुलसोबत दारूच्या पैशांवरून शंकरने भांडण उकरून काढले. यानंतर काठीने त्याला बेदम मारहाण करून जबर जखमी केले. यानंतर डोक्यावर दगडाने प्रहार करीत त्याचा खून केला. सकाळी ६ च्या सुमारास गावातील शेततळ्यानजीक त्याचा मृतदेह मोठा भाऊ दिगंबर रामदास इंगळे (४१) याला आढळला. तेथपर्यंत अनेक ठिकाणी रक्ताचे आणि फरफटत नेल्याच्या खुणा होत्या. त्यांनी शिरखेड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून ठाणेदार सचिन लुले यांनी पोलिस पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांनीही घटनास्थळाला भेट दिली. शंकरविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.
पोलिसांच्या श्वानाने काढला आरोपीचा माग अमरावती येथून श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. राहुलचा मृतदेह जेथे आढळला, तेथून आरोपीच्या घरापर्यंत श्वानाने माग काढून आरोपीची ओळख पटवण्यात मदत केली. आरोपी शंकरला अटक करण्यात आली. त्याने खुनाची कबुली दिली. ठाणेदार सचिन लुले हे तपास करीत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





