आमनेरची ‘अशिया’ ठरली हुंडाबळी; ‘शाहिस्ता’चा मृतदेह ड्रममध्ये आढळला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २८ मे रोजी सकाळी ९:३० ते १०:३० या कालावधीत वरूड तालुक्यातील आमनेर येथे ही घटना घडली. लग्नात आंदण कमी दिले म्हणून पतीसह सासरच्या मंडळीने तिचा अनन्वित छळ चालविला होता, अशी तक्रार मृताच्या पित्याने वरूड पोलिसांत नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी २८ मे रोजी सायंकाळी मृताच्या पतीसह दीर व एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. तिघांनाही बुधवारी रात्रीच अटक करण्यात आली. अर्शिया शेख फईम (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

अब्दुल फईम अब्दुल रहीम (३४), अब्दुल नदीम अब्दुल रहीम (३०) व एक महिला (सर्व रा. आमनेर, वरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील रहिवासी अकबर खान सदर खान (५५) यांनी याबाबत तक्रार नोंदविली.

अशी आहे तक्रार लग्नात आंदण कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासू व दिराने छळ केल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप अकबर खान यांनी केला. त्या आधारे वरूड पोलिसांनी पती अब्दुल फईमसह दीर अब्दुल नदीम व सासू अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यांना रात्रीच ताब्यात घेतले. गुरुवारी तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

एफआयआरनुसार, अकबर खान यांची मुलगी अर्शिया हिचे सन २०२२ मध्ये अब्दुल फईम याच्यासोबत लग्न झाले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यावर लग्नात आंदण कमी दिल्याच्या कारणावरून पती अब्दुल फईम, दीर अब्दुल नदीम व सासू यांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. या सततच्या छळाला कंटाळून तिने २८ मे रोजी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेनंतर मृत विवाहितेचे वडील अकबर खान यांनी वरूड ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाकिर कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्याच घरातील पाण्याच्या ड्रममध्ये आढळला. गुरुवारी पहाटे ही घटना उघड झाली. मृत महिलेच्या गळ्यावर तसेच हातावर ब्लेडचे वार दिसून आले आहेत. त्यामुळे तूर्तास या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. मात्र, घटनास्थळावरील दृश्य पाहता घातपाताची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मृत महिलेचा घात की अपघात, हे निश्चित करण्यासाठी पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. शाहिस्ता परविन आसिफ खान (४८, रा. जाकिर कॉलनी, अमरावती) असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलिसांनुसार, शाहिस्ता बी या पती, दोन मुलांसमवेत जाकिर कॉलनीत राहतात. शाहिस्ता बी यांना २२ वर्षे वयाची मुलगी व २० वर्षे वयाचा मुलगा आहे. ते दोघेही दिव्यांग आहेत. त्या मुलांचे पालनपोषण या शाहिस्ता करत होत्या. बुधवारी रात्री हे चौघेही घरात झोपले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आसिफ खान यांना शाहिस्ता बी त्यांच्या जागेवर झोपलेल्या दिसल्या नाहीत. म्हणून त्यांनी घरातच सर्वत्र पत्नीचा शोध घेतला. त्याचदरम्यान काही वेळाने पाण्याच्या ड्रममध्ये शाहिस्ता बी यांचा मृतदेह दिसला. त्यांच्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडचे वारदेखील दिसून आले. ड्रममध्ये रक्त व बाहेर रक्ताने माखलेले ब्लेड आढळले. या घटनेची माहिती आसिफ खान यांनी तत्काळ नागपुरी गेट पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालाअंती हा खून आहे की कसे तसेच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

 

याप्रकरणी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्वष्ट होईल. त्यानंतर तपासाची दिशा निश्चित होईल. घटनास्थळी ब्लेड आढळले.

हनमंत उरलागोंडावार, ठाणेदार, नागपुरी गेट

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!