प्रेमसंबंध, सोशल मीडियाचा अतिरेकही आहे कारणीभूत, चिंता वाढली
अमरावती : महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. गेल्या चार वर्षांत देशभरातून १३ लाखांहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्याचे वास्तव त्यांनी राज्यपालांसमोर मांडले. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात सन २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण १ लाख २७ हजार ५८८ मुली, महिला बेपत्ता झाल्याची नोंद एनसीआरबीने घेतली आहे.
गेल्या अडीच वर्षात (जानेवारी २०२३ ते मे २०२५) अमरावती जिल्ह्यातून ४९९ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यांना लग्नाचे आमिष देऊन फूस लावत पळवून नेण्यात आले. पैकी ४६० मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले, तर गेल्या पाच महिन्यांत ४४६ महिला बेपत्ता झाल्या होत्या. पैकी ३०८ महिला मिळून आल्या. गेल्या काही महिन्यांपासून महिला तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
यामुळे पालकांसह पोलिस प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे अगदी तरुण व वयात आलेल्या मुलीदेखील घरी काहीच न बोलता अचानक बेपत्ता होत असल्याने पोलिसांना देखील त्यांचा तपास करताना मोठी अडचण येत आहे. दरम्यान, प्रशासनासह पालक तसेच समाजातील जबाबदार लोकांनी या विषयावर गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.
99 पाच महिन्यांत मुली बेपत्ता ग्रामीण भागातून यंदाच्या जानेवारी ते मे या पाच महिन्यांत १८ वर्षांखालील २९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्या प्रकरणात अपहरणाचे गुन्हे नोंद आहे.
७३ शोध लागला केवळ ७३ जींचा गेल्या पाच महिन्यांत अमरावती ग्रामीण मुख्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाने ९९ पैकी ७३ जणींना (अल्पवयीन मुलींना) शोधून काढण्यात यश मिळविले.
महिला व मुली बेपत्ता होण्यामागची कारणे काय ?
घरगुती हिंसा आणि गैरवर्तन, गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक दबावामुळे महिला व मुली घर सोडून जातात.
मानवी तस्करी आणि शोषण, प्रेमसंबंध, सोशल मीडियाचा अतिरेक.
पालक व महिलांनी काय काळजी घ्यावी ?
आपल्या किशोरवयीन मुलींकडे पालकांनी, विशेषतः आईने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. किशोरवयीन मुलींच्या जीवनात बदल, विकास होत असल्यामुळे, त्यांना अनेक भावनांचा अनुभव येतो. या भावनांशी जुळवून घेण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आधार देण्याची गरज असते.
गेल्या पाच महिन्यांत १११ मुला-मुलींचे अपहरणाचे गुन्हे दाखल झालेत. पैकी ८३ मुला-मुलींना शोधून आणत त्यांना त्यांच्या पालकांच्या सुपुर्द केले. त्यात ७३ मुलींनादेखील सुखरूप परत आणण्यात आले.
– प्रशाली काळे, प्रमुख, अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष
किशोरवयीन मुलींशी संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. पालकांनी त्यांच्याशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे, ज्यामुळे त्यांच्यातील संबंध मजबूत होतात.
अॅड. सीमा भााकरे, विधी अधिकारी, महिला व बालविकास विभाग
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





