अमरावती:मागील सहा दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू होते. अखेर आज सातव्या दिवशी बच्चू कडूंनी आंदोलन तुर्तास स्थगित केलं आहे.
त्यांनी सरकारला 2 ऑक्टोबरची मुदत दिली आहे. उपोषणामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावत होती.
आज उपोषणाचा सातवा दिवस
असून, अन्नाचा एकही कण त्यांच्या पोटात गेलेला नाही. त्यामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावत असल्याचं समोर येतंय. चार किलो वजन घटलं असून कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या या उपोषणाला माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे.
गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांना रक्ताची उलटी देखील झाली होती. बच्चू कडूंची प्रकृती खालावल्यामुळे कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात देखील त्यांनी मोठा राडा आज केला होता. न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती. अखेर आज सरकारला मुदत देत बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित केलंय.
मागण्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन
उदय सामंत यांनी 15 दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी 30 जून रोजी विशेष बैठक घेण्याचे आणि याबाबत अधिकृत पत्र देण्याचे आश्वासन दिले आहे. सामंत यांनी पत्रातील सर्व मागण्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.आपलं अन्नत्याग आंदोलन आपण मागे घेत नसून पुढे ढकलत असल्याचे कडू यांनी म्हटले. दरम्यान, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडूंनी दिला. त्यानंतर, मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाणी पिऊन कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
रास्ता रोको आंदोलन
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उद्या 15 जून रोजी राज्यभरात करण्यात येणारे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे, उद्या कुणीही रास्ता रोको आंदोलन करू नये, असे आवाहनही यावेळी बच्चू कडू यांनी केले आहे. जर सरकारने दगाफटका केला, विश्वासघात केला तर मंत्रालयात घुसून प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. आम्ही सांगू नागपूरला आणि आंदोलन करू मुंबईला. सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा दाखवू असे सूचक इशारा त्यांनी उपोषण सोडताना दिला.
बच्चू कडू यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत?
– शेतमालाच्या किमान दरावर 20 टक्के अनुदान
– आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ आणि 10 लाखाची आर्थिक मदत तसेच संपूर्ण कर्जमाफी
– दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपये मानधन द्या
– ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष, किमान 5 लाख अनुदान मिळावे
– धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करणे
– धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13 टक्के आरक्षण
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





