निधीऐवजी प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत : विद्यार्थिनींची कुचंबणा
धामणगाव रेल्वे : आगामी २३ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत आहेत. जेमतेम पाच दिवस राहिले असताना तालुक्यात २० पूर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे शालेय सत्रारंभाला स्वागत होत असतानाच विद्यार्थिनींची कुचंबणा होणार, हे नक्की. प्रत्येक जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासन तसेच जिल्हा नियोजन समितीतून दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला जातो. वर्गखोली बांधकाम, शाळा दुरुस्ती, शाळेला संरक्षणभिंत, स्वच्छतागृह बांधकाम अशा विविध कामांसाठी हा निधी खर्च केला जातो. तालुका प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी कोट्यवधीची कामे करण्यात येते. मात्र, मुलींच्या स्वच्छतागृहासारख्या गंभीर बाबीकडे तालुका व जिल्हा प्रशासनाच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, जळगाव मंगरूळ, गव्हा निपाणी, चिंचोली वाघोली, बोरगाव धांदे, गुंजी, बोरवघड यांसह २० गावांमधील शाळांचे स्वच्छतागृह मोडकळीस आले आहेत.
विद्यार्थ्यांची कुचंबणा थांबणार कशी?
जिल्हा परिषद शाळेमध्ये खेळण्यासाठी क्रीडांगण नाही. अनेक शाळेमध्ये रॅम्प नाही. पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. संरक्षणभिंत अर्धवट आहेत. दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प असते. त्यात सर्वात महत्त्वाचे, अनेक वर्षापासून स्वच्छतागृह मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांची कुचंबना थांबणार कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शाळांची दुरवस्था; अग्निशमन नाही इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात टॅब दिले जात आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. कुठे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकांची सोय नाही. कुठे शाळांची सुरक्षा रामभरोसेच आहे. तुटलेला फळा दिसत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी शिक्षणासाठी असतानाही अनेक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळादेखील नाही. काही ठिकाणी तर कम्प्युटरही धूळखात पडून आहेत. अग्निशमन यंत्र कुठेही दिसत नाही. आगामी काळात ही स्थिती राहिल्यास जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश कितपत राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धामणगाव तालुक्यातील ज्या शाळांमधील स्वच्छतागृहे मोडकळीस आली आहेत, त्याबाबत संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. या शाळेतील स्वच्छतागृह दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
सपना भोगावकर, गटशिक्षणाधिकारी,
धामणगाव रेल्वे
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





