कांडलीतील झाले रस्ते गुळगुळीत, सुसाट धावतात वाहन, अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
परतवाडा : कालपर्यंत रस्ते खराब म्हणून वाहतुकीस अडथळा, अपघातास कारणीभूत ठरत होते. पण, आता रस्ते गुळगुळीत झाले तर जीवाला धोका वाढला आहे. अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतीच्या ४० हजारांपेक्षा अधिक नागरिकांवर ही वेळ आली आहे. भरधाव चारचाकी, दुचाकी वाहनांनी तुरळक अपघात घडत असून मोठ्या अपघातापूर्वी धोकादायक ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला भाजप जिल्हा सरचिटणीस रूपेश ढेपे व नागरिकांनी केली आहे.
परतवाडा शहराला लागून कांडली, कविठा या गावांचा समावेश आहे. त्यात कांडली ग्रामपंचायत तालुक्यात सर्वात मोठी आहे. शहरातील नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने त्याच परिसरात राहतात. मुख्य आणि इतर कॉलन्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने नागरिकांसह चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला आहे. तुरळक अपघाताची मालिका असताना मोठा अपघात घडण्यापूर्वी रस्त्यांवर स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी रूपेश ढेपे, विशाल काकड, शंकर मालखेडे, विजय मांडळे, सागर येवले, गोविंद शिरभाते, प्रसाद देशपांडे, श्याम तांडेल, सतीश वर्मा यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली.
शाळा सुरू होताच वाहतुकीत भर
परतवाडा ते कांडली-कविठा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. खड्डे असलेले रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले. त्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहने भरधाव धावतात. मोठ्या प्रमाणात नोकरदार, व्यापारी या भागात राहतात. शाळांची संख्यासुद्धा अधिक आहे. जुळ्या शहरातही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने मोठ्या अपघातापूर्वी स्पीड ब्रेकर बसविणे गरजेचे आहे.
येथे हवे स्पीड ब्रेकर शहरातून जाणाऱ्या कांडली-कविठा मार्गावर अग्रवाल कॉम्प्लेक्स, कविठा स्टॉप चौक, भंसाली कॉन्व्हेंट, साई मंदिर चौक, माउली पान सेंटर चौक, वृंदावन नगर, आकांक्षा शाळा चौक, जि. प. शाळा चौक, बजरंग किराणा (गजानन कॉलनी) आदी ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





