तिवसा नवीन शैक्षणिक सत्र तोंडावर असताना गेल्या चार महिन्यांपासुन तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. जिल्हा परिषदेंतर्गत करण्यात येत असलेल्या या बांधकामावर संबंधित अधिकाऱ्यांनी कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदार मनमर्जीने काम करत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.तिवसा येथील जिल्हा शाळेच्या वर्गखोल्या शिकस्त झाल्यामुळे निर्माण विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे जुन्या वर्गखोल्या पाडून नवीन बांधकाम चार महिन्यांपूर्वी सुरू केले. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधी हे बांधकाम पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. परंतु, कंत्राटदारांनी कासवगतीने कामाला सुरुवात केल्यामुळे वर्गखोल्यांच्या भिंती उभारणीचे काम आता झाले असून त्यावर अद्यापही छप्पर टाकण्यात आले नाही. तेव्हा विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात जुन्या शिकस्त वर्गखोल्यांमधूनच करावी लागणार आहे. तरी नव्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
पंचायत समितीमुळे दिरंगाई शिकस्त असलेल्या जुन्या वर्गखोल्या पाडण्यासाठी पंचायत समितीने दिरंगाई केली. त्यामुळे वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू करण्यासाठी उशीर झाला.
– विजय वानखडे, अभियंता, जि. प. बांधकाम विभाग
पंचायत समितीकडून जुन्या वर्गखोल्या डिस्मेंटल करून पाच महिने होत आहेत. तरीसुद्धा दोन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. हे कंत्राटदारांचे अपयश आहे.
चंद्रशेखर रामटेके, शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. तिवसा
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





