तिवसा : राष्ट्रीय महामार्गावर मोझरी ते तिवसा दरम्यान दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात लुटारूंनी पोलिस असल्याचे सांगून व्यावसायिकाकडील ४५ ग्रॅम सोने लुटले. ही घटना बुधवारी सकाळी ११:४५ वाजता मोझरी येथे महामार्गावर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर घडली.
गुरुदेवनगर येथील रहिवासी गजानन शंकरराव पांडे (५५) यांचे मोझरी व तिवसा येथे बीअर बार आहेत. ते नेहमीप्रमाणे एमएच २७ बीव्ही क्रमांकाच्या मोपेडने तिवसा येथे येत होते. मोझरीहून पुढे एक किलोमीटर अंतरावर मागून दुचाक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यापुढे दुचाकी आडवी लावून अडविले. दोन दिवसांपूर्वी या परिसरात मोठा दरोडा पडला आहे. आम्ही गुन्हे शाखेचे अधिकारी आहोत. तपासणी करीत आहोत, अशी बतावणी त्यांनी केली. तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याचा गोफ, लॉकेट व हातातील अंगठी काढून ठेवा, असा दम भरला. गजानन पांडे यांनी ऐवज काढण्यास नकार देताच त्यातील एकाने गोफ व अंगठी हिसकावून कागदात गुंडाळली. पांडे यांनी सोन्याची
मागणी करताच सोने गुंडाळलेला कागद रस्त्यावर फेकत असल्याचे दाखवत त्यांनी अमरावतीच्या दिशेने धूम ठोकली. रस्त्यावर फेकलेला कागद उचलताच त्यात दगड व माती आढळून आली.
गजानन पांडे यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडील ३५ ग्रॅम सोन्याचा गोफ, १० ग्रॅमचे लॉकेट व १० ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण तीन लाख १५ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. तिवसा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
दिवसाढवळ्या ऐवज लुटण्याची पहिलीच घटना दिवसाढवळ्या एवढा मोठा ऐवज लुटण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. गजानन पांडे यांचे धाकटे बंधू अजय पांडे हे भाजपचे माजी आमदार साहेबराव तट्टे व माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांचे स्वीय सहायक राहिले आहेत.
धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या दोघांकडून शस्त्राने वार होऊ नये, या भीतीपोटी मी कसलाही प्रतिकार करू शकलो नाही. मला काही सुचायच्या आतच हा संपूर्ण घटनाक्रम घडला.
गजानन पांडे, व्यावसायिक
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





