
पोहरा बंदी संरक्षित वनपरिक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंगलात उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना सातत्याने घडतात. या आगीपासून वनसंपत्ती वाचविताना वनकर्मचाऱ्यांना अग्निपरीक्षाच द्यावी लागते. अशातच अत्याधुनिक ब्लोअर मशीनचा वापर करण्यात येतो. ही ब्लोअर मशीन आग विझविताना धोकादायक ठरू शकते.
जंगलातील वनसंपत्तीला लागलेली आग विझविताना वनकर्मचारी पेट्रोलने भरलेली ब्लोअर मशीन पाठीवर घेऊन आगीचा सामना करतात. या अत्याधुनिक ब्लोअर मशीनच्या वापरामुळे जंगलातील आग झपाट्याने वीजविण्यास मदत होत असली तरी ती वनकर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतणारी आहे.
आग विझविताना रखरखती ऊन, सोसाट्याचा वारा, समोर आगीचे लोंढे व पाठीवर पेट्रोलने भरलेली १५ किलो वजनाची ब्लोअर मशीन वनकर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
परंतु, वनसंपत्ती वाचविण्यासाठी वनकर्मचारी जिवाची पर्वा न करता ब्लोअर मशीनच्या साहाय्याने आगीशी दोन-दोन हात करतात, हे विशेष.
जीव मुठीत घेऊन आगीवर नियंत्रण आग विझविण्यासाठी खांदा व कमरेवरील चारही बेल्ट लावून ही मशीन पाठीवर घेतली जाते. किकने मशीन सुरू करण्यात येते. आग विझविताना पाइपमधून हवेचा उच्च दाब बाहेर येतो व त्या उच्च दाबाच्या हवेद्वारे आग आटोक्यात आणली जाते. पुढ्यात अग्निज्वाळा असताना ब्लोअर मशीन धोकादायक ठरू शकते. अशावेळी खांदा व कमरेवरील आपातकालीन बेल्ट काढून मशीन समयसूचकता बाळगून अंगाच्या दूर करणे हाच उपाय आहे.
अशी आहे ब्लोअर मशीन ११४ सेंटिमीटर गोलाई व ४५ सेंटिमीटर उंची अशी हंडा आकाराची १५ किलो वजनाची ही ब्लोअर मशीन आहे. या मशीनला एक लांब पाइप असतो. त्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली जाते. त्या पाइपची लांबी ११९ सेंटीमीटर तर, गोलाई २७ सेंटीमीटर आहे. या मशीनमध्ये दीड लिटर पेट्रोल व ५० मिली ऑइल टाकले जाते. या मशीनला एक किक, एक्सीलेटर बटन, खांद्यावर दोन व कमरेला दोन असे चार बेल्ट असतात. या बेल्टला आपातकालीन बेल्टदेखील म्हटले जाते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






