पहूरच्या वायरमनचे वेळकाढू धोरण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती :  तालुक्यातील पहूर या गावासाठी नेमलेल्या वायरमनच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषिपंपाचा विद्युतपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेली वांगी, भेंडी, उन्हाळी तीळ व लिंबू, संत्री व इतर फळबागा ओलिताअभावी रखरखत्या उन्हात सुकत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.

कृषी पंपाचा विद्युतपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी येथील वायरमनला दिली, तर त्यांच्याकडून उपाययोजना वा समाधानकारक उत्तरे मिळणे तर दूरच, प्रतिप्रश्न करून वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. आधीच या तालुक्यात ओलिताचे क्षेत्र कमी आहे. सिंचनासाठी कोणताही मोठा प्रकल्प नाही. विहिरीच्या भरवशावरच शेतकऱ्याचे अल्प क्षेत्रात ओलित केले जाते. त्यातही भारनियमनामुळे आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसाउजेडी विद्युतपुरवठा केला जातो. या तीन दिवसांतच शेतकऱ्यांना आपली ओलिताची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, अन्यथा पुन्हा आठवडाभर दिवसा होणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी वाट पाहावी लागते. त्यातही विद्युतपुरवठा खंडित झाला, तर शेतकऱ्यांची रखरखत्या उन्हात शेतातून थेट डीबीवर पायपीट सुरू असते. पहूर येथील गावालगतच्या बेले डीपीत फ्यूज टाकण्याची व्यवस्था नसल्याने अपघाताची भीती आहे. या डीपीची दुरुस्ती करून विद्युतवाहिनीचे झुकलेले पोल सरळ करणे गरजेचे आहे. रखरखत्या उन्हात भाजीपाला पिके व फळबागा जगवण्यासाठी विद्युतपुरवठा सुरळीत करावा व येथे कार्यतत्पर वायरमनची नेमणूक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!