मुंबईत सरन्यायाधीशांच्या ‘प्रोटोकॉल’चा विसर, नागपुरात मात्र विमानातून उतरताच…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर शुक्रवारी न्या.भूषण गवई पहिल्यांदाच नागपुरात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले.

 

 

 

नागपूर : मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर शुक्रवारी न्या.भूषण गवई पहिल्यांदाच नागपुरात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. मागील महिन्यात सरन्यायाधीशांचा सत्कार सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख प्रशासकीय अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी न आल्यामुळे सरन्यायाधीशांनी जाहीरपणे नाराजी जाहीर केली होती.

अधिकाऱ्यांना विसर पडलेल्या प्रोटोकॉलची त्यांनी आपल्या भाषणातून आठवण करून दिली होती.

 

नागपुरात काय घडले?

सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपूरमध्ये शुक्रवारपासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आहेत. यात न्या. गवई यांच्या दोन सत्कार सोहळ्यापासून ते संविधान पार्कचे उद्घाटन, महाराष्ट्र विधि विद्यापीठातील इमारतीचे उद्घाटन यांचा समावेश आहे. जिल्हा वकील संघटनेच्यावतीने सरन्यायाधीश गवई यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात येईल. हा कार्यक्रम सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण आणि संविधान उद्देशिका, नूतनीकृत ग्रंथालय व कार्यालयाचे उद्घाटन केले जाईल. यानंतर शनिवारी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने सायंकाळी ६.३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या हस्ते न्या. गवईंचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी दुपारी ४.३० वाजता नागपूर खंडपीठ येथील नवनिर्मित वकील कक्षाचे सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.

सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते येत्या रविवारी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांसाठी आलेल्या सरन्यायाधीश यांच्या स्वागतासाठी विमानतळावर सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी बघायला मिळाली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल,विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार, कुलसचिव डॉ. रागिणी खुबालकर आणि उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्वागत केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013528
error: Content is protected !!