सौम्या शर्मा यांनी फ्रेजरपुरा, सुकळी कंपोस्ट डेपो, गुलिस्ताननगर परिसर पिंजून काढला
अमरावती : महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी कचरा संकलन केंद्र फ्रेजरपुरा, सुकळी कंपोस्ट डेपो आणि गुलिस्ताननगर परिसराची पाहणी केली.
स्वच्छ अमरावतीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचनाही दिल्या. फ्रेजरपुरा परिसरातील कचरा तातडीने कमी करण्याचे आदेश देताना त्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. रस्त्यावरील कचरा त्वरित हटवावा प्लास्टिक गोळा करून रस्त्याच्या दोन्ही बाजू स्वच्छ ठेवाव्यात. तसेच दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे पुनर्वापर व पुनर्निर्मिती करून शेतकऱ्यांना सेंद्रिय खत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
सुकळी कंपोस्ट डेपोच्या कार्यपद्धतीची पाहणी करताना आयुक्तांनी येथे कार्यक्षमतेने कचरा प्रक्रिया होऊन नागरिकांना दिलासा मिळावा. अमरावती महानगरपालिकेचा हा शास्त्रोक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प देशात आदर्श ठरावा, यासाठी आवश्यक ते उपाय करावे, अशा सूचना दिल्या.
प्रकल्पस्थळी वापरल्या जाणाऱ्या बायोकल्चर फवारणी, विंड्रो पद्धत आणि तयार होणारे सेंद्रिय खत याचे व्यवस्थित नियोजन करून त्याचा उद्यान व शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करावा, असे सूचित केले. नागरिकांमध्ये एकल वापर प्लास्टिकविरोधात अधिक प्रभावी जनजागृती करावी, असा आदेशही त्यांनी दिला.
गुलिस्ताननगर परिसराची पाहणी करताना सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करून आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगितले की, “साफसफाई ही एक सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून आपल्या परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य सुधारते आणि जीवनमान उंचावते, असे त्यांनी अधोरेखित केले.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, अभियंता राजेश आगरकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड, कुंदन हडाले, शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ्य निरीक्षक, कंत्राटदार प्रतिनिधी व इतर मनपा कर्मचारी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





