अमरावती शहरातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर एका जखमी आरोपीवर उपचार सुरू आहेत.
अमरावती : अमरावती शहरातील वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या हत्येच्या घटनेमुळं अमरावती शहरात खळबळ उडाली. सहायक पोलीस निरीक्षकाच्या भावानं व्याजानं घेतलेल्या पैशांची परतफेड न केल्यानं उद्भवलेल्या वादातून सावकारांनी पोलीस निरीक्षकाचीच हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल कलाम (वय 56) असं मृत सहायक पोलीस उपनिरीक्षक यांचं नाव आहे.
दुचाकीला दिला धडक देत केला धारदार शस्त्रानं वार : शनिवारी सायंकाळी अब्दुल कलाम हे वलगाव पोलीस ठाण्यातून दुचाकीनं घरी निघाले होते. यावेळी नवसारी टी पॉईंट इथं मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर कारमधून दोन युवक उतरले. यानंतर त्यांनी अपघातात गंभीर जखमी असणाऱ्या अब्दुल कलाम यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करत त्यांचा खून केला. या घटनेनंतर धारदार शस्त्रानं वार करणारे दोघेही फरार झालेत. तर चारचाकी चालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळं पोलीस दलात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री आरोपींच्या शोधासाठी मोहिम राबवली.
दोन आरोपींना अटक, एक रुग्णालयात : पोलीस आयुक्त अरविंद चवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या नेतृत्वात गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला देखील अटक केली जाईल असं पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितलं.
पैशाच्या वादातून हत्या : “जमील कॉलनी परिसरातील रहिवासी सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांचे मोठे भाऊ यांनी एका खाजगी सावकाराकडून पैसे घेतले होते. या पैशांची परतफेड न केल्यानं सावकाराचे कुटुंब आणि अब्दुल कलाम यांच्यात वाद झाला. याच वादातून सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांची हत्या झाली. या प्रकरणात तपास अधिकारी आणखी तपास करत आहेत,” अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.
शासकीय इतमात अंत्यसंस्कार : शवविच्छेदनानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांच्यावर लालाखडी परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गाडगेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्यासह यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





