
अमरावती : क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी स्टोन होऊन तडफडत प्राण गमावणे हेच जनुनावासीयांचे विधिलिखित असावे, अशी स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या आजाराने प्रत्येक घरातील सदस्य ग्रासलेला आहे, तर अनेकांनी प्राण गमावले आहेत.
मेळघाटातील प्रत्येक गावात काही गोष्टी समान आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आणि शुद्ध पेयजल नसणे हे त्यापैकी प्रमुख. याच मेळघाटात असणारे, पण अचलपूर तालुक्याच्या टोकावरील जनुना हे गाव जेमतेम १७०० लोकवस्तीचे. या गावात अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा स्रोत म्हणजे भूगर्भातील क्षारयुक्त पाणी. बोअरमधून घागरीत आणि थेट घशात. ना तपासणी, ना फिल्टर. त्यामुळे घरोघरी मूत्राशय विकाराचे रुग्ण आहेत.
शिक्षणाचा अभाव व अंधश्रद्धा याला शरण जात जनुना या गावातील अनेकांनी आपल्याला होणाऱ्या प्रचंड शारीरिक वेदना, आपला आजार यासंदर्भात कुठल्याच तपासण्या केल्या नाहीत. मात्र, असह्य वेदनेने घरातच विव्हळणारे अनेक जण या गावात पाहायला मिळतात. यापैकी काही रुग्ण स्वतःहून पुढे अकोल्याच्या डॉक्टरांकडे, तर काही रुग्ण परतवाडा आणि अमरावती येथील डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या गावाला पाणीपुरवठा योजना आहे. तथापि, टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंबंधी z24news.dreamhosters.comने कार्यकारी अभियंता विवेक सोळंके यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही.
सहा महिन्यांपासून डायलिसिसवर क्षारयुक्त पाण्यामुळे मूत्रपिंडाचा विकार झाल्यामुळे सुरेश महारनार हा २८ वर्षीय तरुण डायलिसिसवर आहे. त्याने अकोला येथील डॉक्टर भुसारी यांच्याकडे उपचार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून परतवाडा येथील तालुका रुग्णालयामध्ये त्याच्यावर डायलिसिस केले जात आहे. गावातील पिण्याच्या पाण्यात क्षार असल्यामुळे माझ्यासह अनेकांची अशी अवस्था झाल्याचे सुरेश महारनार याने सांगितले.
आम्हाला प्यायला चांगले पाणी नाही. आजारी पडलो, तर आरोग्य सेवादेखील नाही. अशी वाईट परिस्थिती आमच्या गावची आहे. दोन वर्षात क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी स्टोनने सात ते आठ ग्रामस्थांचे निधन झाले. आजदेखील गावात सात ते आठ जण या आजाराचे रुग्ण आहेत.
– साहेबराव थोरात (ग्रामस्थ)
काय झाले शुद्ध पाणीपुरवठ्याच्या आश्वासनाचे?शहानूर धरणातील पाणी दीडशे किलोमीटर लांब अंतरावर असणाऱ्या खारपाणपट्ट्यातील २३५ गावांना पुरविले जाते. ते पाणी दर्यापूर भातकुली तालुक्यात जात असताना धरणापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जनुना गावात पोहोचत नाही, ही खरी शोकांतिका आहे. दोन वर्षांपूर्वी गावात प्रत्येक घरात रुग्ण आढळून आल्यावर पिण्याचे शुद्ध पाणी गावात पुरविले जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत गावात पिण्यायोग्य पाणी मिळाले नाही.
पाण्याच्या टाकीचे काम संथगतीने जनुना येथे पिण्यासाठी शुद्ध पाणी येईल, यासाठी पाइप लाइन टाकली जात असतानाच गावात पाण्याची टाकीदेखील उभारली जात आहे. खरेतर एप्रिल महिन्यातच पाण्याची टाकी उभी राहील, असे प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना सांगण्यात आले होते. मात्र, या टाकीचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून आणखी सहा महिने तरी ही टाकी पूर्णपणे उभी राहण्यास वेळ लागणार आहे.
गावात आरोग्य केंद्रच नाही परतवाडा-अकोला मार्गावर असणाऱ्या पथ्रोट गावापासून १८ किलोमीटर अंतरावर उंच पहाडावर जनुना हे गाव आहे. शहानूर धरणापासून उंचावर सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. गावामध्ये कुठलाही दवाखाना नाही. गावातील रुग्णांना उपचारासाठी पथ्रोट हे गावच गाठावे लागते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






