कापड व्यावसायिकाची रोकड घेऊन कर्मचारी पसार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : एका कापड व्यावसायिकाची वसुलीची १ लाख ९१ हजार ९ रुपयांची रोकड घेऊन कर्मचारी पसार झाला. ही घटना सोमवार, ६ मे रोजी नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर चंदूमल रोहिडा (२७) रा. रामपुरी कॅम्प असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी संजय सेवकराम कटारिया (३३) यांचे सिटीलॅण्ड या व्यापारी संकुलात कापडाचे दुकान आहे. ते पॅन्ट व शर्ट होलसेल विक्रीचा व्यवसाय करतात. ते अन्य दुकानदारांना उधारीवर माल विक्री करतात. त्याच्या वसुलीचे काम संजय यांनी सागरला ५ टक्के याप्रमाणे दिले होते. त्यानुसार सागरने चंद्रपूर व यवतमाळ येथील दुकानदारांकडून २ लाख ७४ हजार ७३९ रुपयांची वसुली केली. परंतु, त्याने

मालक संजय यांना त्यातील केवळ ८३ हजार ७३० रुपये आणून दिले. त्यामुळे संजय यांनी संबंधित दुकानदारांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सर्व रक्कम सागरला दिल्याचे सांगितले. त्यानंतर संजय यांनी सागरला मोबाइलवर कॉल करून याबाबत विचारणा केली. त्यावर सायंकाळपर्यंत दुकानावर पैसे आणून देतो, असे तो म्हणाला. त्यानंतर त्याने संजय यांना मोबाइलवर मेसेज केला. मी एका मुलीसोबत पळून जात आहे. ७ ते ८ दिवसांनी परत आल्यावर बघू, असे मेसेजमध्ये नमूद होते. त्यामुळे संजय यांनी सागरला कॉल केला. मात्र, मोबाइल बंद येत होता. त्यानंतर संजय यांनी सागरच्या घरी जाऊन विचारणा केली. त्यावेळी घरच्यांनी तो बाहेरगावी गेला असल्याचे सांगितले. त्याचा मोबाइल सुद्धा बंद येत होता. त्यामुळे संजय यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सागर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!