
परतवाडा : शिव महापुराण कथास्थळी भोजन मंडपात भोजन करीत असताना सिलिंग फॅन डोक्यावर पडल्याने महिला गंभीर जखमी झाली. या दरम्यान या भोजन मंडपात कथा ऐकण्यासाठी स्क्रीनसमोर होणारी गर्दी व जेवणावळीची गैरसोय पाहून पोलिसांनी ते स्क्रीन बंद करायला लावले.
सूत्रांनुसार, शोभा उद्धव गिरी (वय ५०, रा. घामोडिया प्लॉट, परतवाडा) असे डोक्यावर फॅन पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान कथास्थळी जागेकरिता महिलांमध्ये वादही झाला. यातच एक लहान मुलगी गर्दीत हरवली होती. पोलिसांच्या प्रयत्नाने तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.अमरावतीच्या एका महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे तिला उपचारार्थ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. शिव महापुराण कथास्थळापुढील परतवाडा-अंजनगाव मार्गावर दुचाकीची एका महिलेला धडक लागली. तिच्या हाताला खरचटल्याने रक्त निघाले. ते पाहून तिच्या आईला भोवळ येऊन ती रस्त्यावरच कोसळली. या मायलेकींना तत्काळ रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर औषधोपचार केले.
भोजनस्थळी गोंधळ शिव महापुराण कथास्थळी भाविकांच्या भोजनाकरिता उभारलेल्या स्वतंत्र पेंडॉलमध्येच कथा ऐकू यावी म्हणून दोन स्क्रीन लावले गेले. लोक येथेच बसून कथा ऐकत असल्यामुळे भोजन व्यवस्थेत गोंधळ उडाला. पोलिसांनी ही बाब आयोजकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर ते स्क्रीन बंद झाले. महिलांकरिता पाच आणि पुरुषांकरिता पाच अशा स्वतंत्र टेबल-खुच्र्यांच्या रांगेत भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






