
परतवाडा : सपन धरणाच्या कालव्यात साचलेल्या एका खड्ड्यातील पाण्यात चिमुकल्यांनी उडी घेतली. पाठोपाठ आठ वर्षांच्या चिमुकलीनेही उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने ती खड्यात बुडाली. ताई पाण्यावर न आल्याने घाबरलेली सहा वर्षीय अनुष्का ओरडत सुटली. एका व्यक्तीने उडी घेऊन तिला बाहेर काढले. गंभीर असलेल्या चिमुकलीला तत्काळ खाजगी दवाखान्यात भरती केले. परंतु, तिची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी अचलपूर तालुक्यातील धारणी मार्गावरील वड़झर येथे ही दुर्घटना घडली.
अनन्या सुशील अखंडे (८, रा. वड़झर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. रोजगार सेवक असलेले सुशील अखंडे यांचे शेत कालव्याला लागून आहे. अनन्या व अनुष्का या चिमुकल्यांसह आजूबाजूची आदिवासी शेतकऱ्यांची मुले येथे खेळतात. बुधवारी अनन्यानेसुद्धा इतर मोठ्या मुलांना बघून कालव्याच्या खड्यात जमा झालेल्या पाण्यात उडी घेतली. रामजी जामूनकर यांनी तिला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर परतवाडा येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथून उपजिल्हा रुग्णालयात दाखवताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी उपजिल्हा रुग्णालयात अखंडे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. अनन्या वाचू शकली नसली तरी सहा वर्षीय अनुष्काची समयसूचकता परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






