
अमरावती : हिस्सेवाटणीतील ३० हजार रुपये दे किंवा तुझ्याकडील ऑटोरिक्षा दे, असे बजावत मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ७ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास लालखडी येथे ही घटना घडली.
मो. बेग रशीद बेग (२४, लालखडी) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी शरीफ बेग उर्फ बबलू रशीद बेग (२६, रा. लालखडी) याच्याविरुद्ध ७ मे रोजी दुपारी गुन्हा दाखल केला. मो. बेग हा ७ मे रोजी सकाळी झोपला असताना, आरोपी शरीफ बेग त्याच्या घरी आला. त्याला पैसे वा ऑटो यापैकी एक मागितल. त्यावर ऑटोरिक्षा माझा आहे, मी घेतला आहे. तो मी कसा देऊ शकतो, असे म्हणत मो. बेग याने त्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी शरीफ बेग याने शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने वार केले. धाकट्या भावाला रक्तबंबाळ स्थितीत टाकून आरोपी तेथून पळून गेला. यादरम्यान मो. बेग याला पत्नी व वहिनीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. नागपुरी गेट पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून मो. बेगचे बयान नोंदविले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






