
अमरावती : लोकसभेसाठी मतदान २६ एप्रिल रोजी झाले. आता मतमोजणीची प्रतीक्षा असून, ४ जून रोजी विजयी कोण होणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. मात्र, अमरावतीच्या सट्टा बाजारात काँग्रेस उमेदवार ‘हॉट फेव्हरेट’ असल्याचे वास्तव आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून ३७ उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. ईव्हीएममध्ये उमेदवारांचे भाग्य सील झाले असून, नवा खासदार कोण असेल हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. परंतु, प्रमुख लढतीतील उमेदवारांचे समर्थक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ‘भाऊ, ताईंचा विजय पक्का’ अशी गॅरंटी देत आहेत. असे असले तरी सट्टा बाजारातील बुकींच्या आकलनानुसार काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना ६० पैसे, तर भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना १ रुपये ३० पैसे दिला जात आहे. सट्टाबाजारातील भावानुसार तूर्तास काँग्रेसचे बळवंत वानखडे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
बळवंत वानखडे महाविकास आघाडीतून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी महायुतीच्या उमेदवाराला थेट लढत दिली. आघाडीतील उद्धवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकजुटीने विजयासाठी ताकद लावली. सट्टा बाजारात वानखडे यांना ६० पैसे इतका आहे.
नवनीत राणा विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून भाजपने उमेदवारी बहाल केली. गत १० वर्षापासूनचा दांडगा जनसंपर्क, महिलांचा पाठिंबा, भाजप नेत्यांच्या भरवशावर मोठ्या ताकदीने त्यांनी लोकसभेची ही निवडणूक लढविली. मोठे नेते त्यांच्या प्रचारासाठी होते. सट्टा बाजारात त्यांच्या विजयाला १ रुपये ३० पैसे भाव आहे.
११ लाख ६९ हजार ९७ मतदारांनी बजावला हक्क अमरावती लोकसभा मतदारसंघात १८ लाख ३६ हजार ७८ एवढी मतदार संख्या आहे. त्यापैकी ११ लाख ६९ हजार ९७ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांचा करिष्मा फार चालला नाही. त्यामुळे आंबेडकरी मतांचे विभाजन टळले. प्रहारचे दिनेश बूब यांना किती मते. याचा अंदाज घेतला जात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






