
अमरावती : शेअर मार्केटमध्ये अधिकाधिक नफा मिळवून देण्याची बतावणी व आभासी नफा दाखवून येथील एका २४ वर्षीय तरुणाला ५ लाख ६९ हजार ४०० रुपयांनी गंडविण्यात आले. ४ मार्च ते १५ मे या कालावधीत ती फसवणुकीची घटना घडली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी २८ मे रोजी अज्ञात तीन व्हॉट्सअॅप ग्रुप धारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सागर विनायकराव उंबरकर (२४, रा. देवीनगर, वडाळी) याला अज्ञात व्हॉट्सअॅप युजरने डिस्काऊंट रेटवर शेअर मिळवून देण्याचे व भरमसाठ प्रॉफिट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट देखील करण्यात आले. तसेच एका बनावट अॅपवर शेअर मार्केटमध्ये नफा होत असल्याचे देखील दर्शविण्यात आले. पुढे शेअरमध्ये नफा होत असल्याचे दाखवून तसेच वेगवेगळी कारणे सांगून त्याला पैसे गुंतविण्यास प्रवृत्त करण्यात आले. अशा रीतीने त्याने ५ लाख ६९ हजार ४०० रुपये त्यात गुंतविले. त्याला आभासी नफा देखील दाखविण्यात आला. मात्र, ती रक्कम विड्रॉल वा ट्रान्सफर न झाल्याने त्याला फसवणुकीची जाणीव झाली. याप्रकरणी, सायबर पोलिसांनी हार्बर वेस्ट इन्व्हेस्टमेंट डिस्कशन ग्रुप सीसी ९६, हार्बर वेस्ट डेडिकेटेड सर्व्हिस ग्रुप एक व हार्बर वेस्ट इन्व्हेस्टमेंट डिस्कशन ग्रुप एए या तीन व्हॉटस्अॅप ग्रुपच्या युजर्स विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






