
अमरावती : पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली उभ्या असलेल्या आई व तरुण मुलाला भरधाव कारने उडवले. या अपघातात आईचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात ६ जून रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुपर एक्स्प्रेस हायवेवरील तपोवन गेटजवळ घडला. सुनंदा काशीनाथ मेश्राम (५५) असे मृताचे, तर शुभम काशिनाथ मेश्राम (२६) असे जखमीचे नाव आहे.
नांदगाव पेठलगतच्या सावर्डी येथील रहिवासी शुभम हा आई सुनंदा यांच्यासह कामानिमित्त अमरावतीला आला होता. दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने ते सुपर एक्स्प्रेस हायवेलगत तपोवन गेटजवळ एका झाडाखाली उभे होते. त्यावेळी अकोलाकडून नागपूरकडे जात असलेल्या कार क्रमांक (एमएच १४, एचके ०२६५) च्या चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे अनियंत्रित कार ही हायवेवरील दिशादर्शक फलकाला धडक देत खाली उतरली. त्यानंतर भरधाव कारने झाडाखाली उभ्या असलेल्या सुनंदा व त्यांचा मुलगा शुभम यांनाही उडवले. या अपघातात सुनंदा यांचा मृत्यू झाला, तर शुभम हा गंभीर जखमी झाला. अपघाताबाबत माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमी शुभमला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






