
अमरावती : महाआघाडीचे नवनियुक्त खासदार बळवंत वानखडे यांच्या ४ जून रोजी सायंकाळी निघालेल्या विजयी रॅलीत अश्लील हातवारे व असभ्यतेचे वर्तन करणाऱ्या अनोळखी २० ते २५ जणांविरूद्ध कोतवाली पोलिसांनी ५ जून रोजी रात्री गुन्हा नोंदविला. त्याबाबत व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत गुन्हा नोंदवून घेतला. सहायक पोलिस उपनिरीक्षक अरविंद महल्ले यांनी याबाबत तक्रार नोंदविली.
४ जून रोजी सायंकाळी बळवंत वानखडे यांची विजयी रॅली निघाली. त्यावेळी अरविंद महल्ले हे राजकमल चौकात ड्युटीवर होते. त्यांच्या ड्युटीदरम्यान राजकमल चौक येथे काही कार्यकर्ते ढोल-ताशे घेऊन बळवंत वानखडे यांच्या विजयाचा जल्लोष करण्याकरिता आले. पिवळी माती उधळून व फटाके फोडून,घोषणाबाजी करून ते ७:१५च्या सुमारास निघूनदेखील गेले. दरम्यान, ५ जून रोजी राजकमल चौक येथे सात ते आठ कार्यकर्ते घोषणाबाजी करत अश्लील हातवारे करीत असल्याचा समाज व्हिडीओ माध्यमांवर प्रसारित झाला. त्या व्हिडीओची पाहणी केली असता,त्यात राजकमल चौक येथे सात ते आठ कार्यकर्ते घोषणाबाजी करून अश्लील हातवारे व अश्लील शब्दप्रयोग करीत असभ्यतेचे वर्तन करीत असल्याचे दिसून आले. आपण ४ जूनला जेथे ड्युटीवर होतो, तो तिथलाच व्हिडीओ असल्याचे महल्ले यांच्या लक्षात आले.
सात जणांना घेतले ताब्यात नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयी रॅलीत अश्लील हातवारे करण्याच्या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी सात जणांना गुरुवारी ताब्यात घेतले.राजकमल चौकात जल्लोष करत असताना काही तरुण अश्लील हातवारे करून शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.त्याची दखल घेत पोलिसांनी ५ जून रोजी रात्री गुन्हा दाखल केला होता. तर गुरुवारी आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने सिटी कोतवाली पोलिसांनी व्हायरल व्हिडीओतील तरुणांची चेहरे ओळख करत गुरुवारी दुपारनंतर सात जणांना ताब्यात घेतले. त्यात मो. शेख मो. जहीर (३३, गवळीपुरा), शेख उमर शेख रहिम (४६, गवळीपुरा), मो. शहजाद मो. रफिक (३०, रा. अलिमनगर, लालखडी), मो. ताज शेख हबीब (३९, अवेजनगर),महरूकउल्ला खान तस्लिमउल्लाखान (३१, नागपुरी गेट) मो. नवाज मो. आरिफ (१८९, सादियनगर) व शेख शाहरूख शेख मेहबूब (२९, रा. रतनगंज) यांचा समावेश आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






