
अमरावती : दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे गत आठ दिवसांपासून अर्ध्या महानगरात घाण, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे. हे घाणयुक्त पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या घरातून पाणी नमुने घेत ते तपासणीकरिता पाठविले. नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेले मजीप्राचे अभियंते नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालवित असल्याचे चित्र आहे. बडनेरा नवी वस्ती आणि जुनी वस्ती, निंभोरा, यशोदानगर, संजय गांधीनगर, मोतीनगर, दस्तुरनगर, शंकरनगर, जुने बायपास, राजापेठ, यवतमाळ मार्गालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये नळाद्वारे घाण, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे. बडनेरा नवी वस्तीस्थित सिंधी कॅम्प, पवननगर, इंदिरानगर या भागात नळाद्वारे देखील नियमितपणे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. प्रारंभी नळ आल्यानंतर किमान तास अर्धा तासभर घाण, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची गाऱ्हाणी गृहिंणीच्या आहेत. त्याबाबत संबंधित अभियंत्यांना देखील माहिती आहे. तरीही बडनेरा भागातील अभियंत्यांनी केवळ टाईमपास चालविला आहे. येत्या काही दिवसात पावसाळा लागणार असून, नळाद्वारे घाण, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास कोण जबाबदार राहील, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. जलवाहिनीचे लिकेज शोधून ते दुरुस्त करावे, अन्यथा अभियंत्यांना घेराव करून कोंडून ठेवले जाईल, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी दिला आहे.
गत १० दिवसांपासून नळाद्वारे घाण, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला येणाऱ्या पाण्याजवळ उभेसुद्धा राहू शकत नाही, अशी विदारक स्थिती आहे. आज-उद्या कधीतरी शुद्ध पाणी येईल, याची प्रतीक्षा आहे. मात्र, १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असताना जैसे थे स्थिती आहे. पाणी नमुने तपासणी घेऊन गेले आहेत.
शारदा रोकडे, गृहिणी बडनेरा इंदिरानगर
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






