
कारंजा :- गेल्या तीन वर्षापासुन कांदाचाळीची लाॅटरी लागत नसल्याने कृषी विभागाच्या या कांदाचाळ सोडतीबद्दल आता शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र कांरजा तालुक्यात पहावयास मिळत आहे. अशातच शेतकऱ्यांची कांदा चाळीसाठीची प्रतिक्षा मात्र अद्यापही कायम आहे.
कृषी विभागाच्या सोडत प्रक्रीयेबद्दल शेतकऱ्यात संभ्रम
दिवसेंदिवस या ना त्या कारणांमुळे कृषी व्यवसाय तोट्यात जात असल्याने पारंपरीक पिकांना बगल देत शेतकरी नवनविन पिेके घेत आहेत. अशातच दैनंदिन खर्चासाठी हाताशी पैसा राहावा म्हणुन सिचंनाची सोय असणारे काही शेतकरी कांदा पिकाकडे वळले. त्यामुळे मागील काही दिवसात कांदा लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. पंरतु कांदा निघाल्यानंतर अपेक्षीत भाव मिळत नसल्याने साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला. यावर उतारा म्हणुन राज्य शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातुन यासाठी कांदा चाळ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागत असुन त्यानंतर त्याची सोडत जाहीर हेाते. आणि त्यातील पात्र शेतकऱ्यांना कांदाचाळ बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली जाते. परंतु सन 2020 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यांची निवड मात्र अद्यापही झाली नसल्याने या शेतकऱ्यातून नाराजीचा सुर उमटत आहे.
कांदा हा नाशवंत असला तरीही लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा हा अविभाज्य भाग आहे
कांदा हा नाशवंत असला तरीही लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा हा अविभाज्य भाग आहे. जून ते ऑक्टोंबर प्रसंगी फेब्रुवारीपर्यंत रब्बी हंगामात तयार झालेला कांदा पुरवून वापरला जातो आणि म्हणूनच कांदा साठवणुकीची नितातं गरज भासते. कारण या कालावधीत नवीन कांदा कोठेही उत्पादीत होत नसतो. म्हणुन शास्त्रोक्त पध्दतीने उभारलेल्या कांदाचाळीत 4-5 महिन्यापर्यंत कांदा सुस्थितीत राहू शकत असल्याने होणारे नुकसान टाळून शेतकऱ्याला आर्थिक फायदा वाढविता येऊ शकतो. 50 मेट्रीक टनची कांदाचाळ बांधण्यासाठी साधारणपणे 2 लाख 94 हजार तर 25 मेट्रीक टनची कांदा चाळ बांधण्यासाठी 1 लाख 48 हजार एवढा खर्च येतो. त्यातील 50 टक्के रक्कम अनुदान म्हणुन दिली जाते. परंतु गेल्या काही दिवसापासुन लोखंडाचे भाव वाढल्याने शासनाने ठरवुन दिलेल्या अंदाजपत्रकात कांदाचाळीचे बांधकाम होत नसल्याने अंदाजपत्रकीय रक्कम वाढविण्यात यावी, अशी मागणी सुध्दा केली जात आहे.
तीन वर्षानंतरही प्रतीक्षा कायम
सन 2020 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळीसाठी ऑनलाईन अर्ज भरले त्यांना अद्यापही कांदाचाळीची लॉटरी लागली नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या लॉटरी संदर्भात शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला असून, अद्यापही शेतकऱ्यांना कांदा चाळीची प्रतीक्षा कायम आहे. त्याबरोबरच सद्य परिस्थितीत दिल्या जात असलेल्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांतून केली जात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






