
धामणगाव रेल्वे : रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा फोटो काढून तो अॅपवर अपलोड केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची तत्काळ दखल घेऊन दुरुस्ती केली जाईल, असा नवा नियम सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील वर्षी लागू केला. यासाठी मोबाइल अॅप विकसित केले होते; परंतु या अॅपचा वापर कमी प्रमाणात तर आहेच, शिवाय साबांविकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.
खड्यांसंबंधीच्या तक्रारींसाठी ‘पॉटहॉल कम्प्लेंट रिड्रेसेल सिस्टीम’ (पीसीआरएस) हे अॅप सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केले. परंतु, ते कुचकामी ठरत आहे.
वरिष्ठ दखल घेतात का?नागरिकांच्या तक्रारीची अंमलबजावणी न केल्यास सात दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तरीही दखल न घेतली गेल्यास महिनाभरात तो खड्डा बुजवून मुख्य अभियंत्यांनी संबंधिताची तक्रार दूर करणे अपेक्षित आहे. या प्रत्येक हालचालीवर मंत्रालयातून लक्ष ठेवले जाते; परंतु नियम पाळला जात नसल्याचे दिसून येते.
काय आहे पीसीआरएस अॅप?पीसीआरएस (पॉटहॉल कम्प्लेंट रिड्रेसेल सिस्टीम) हे मोबाइल अॅप सार्वजनिक बांधकाम विभागाने गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध केले. या अॅपच्या माध्यमातून नागरिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यावर असलेल्या खड्यांची तक्रार करू शकतील. तक्रार आल्यानंतर संबंधितांकडून त्याची दखल घेतली जाईल.
अॅप हाताळताना अडचणी पीसीआरएस अॅप हाताळताना अनेक अडचणी येतात. अॅप उघडल्यानंतर त्यात दोन छायाचित्र अपलोड करावी लागतात. फोटो अपलोड केल्यानंतर फीडबॅक नोंदवूनही पुढील प्रक्रिया होत नाही. अडचणी येतात.
गतवर्षी निभोरा राज ते निंभोरा बोडखा या मार्गावरील खड्ड्यांचे फोटो युवकांनी पीसीआरएस अॅपवर अपलोड केले होते; संबंधित विभागाकडून त्यांना फोन आला; परंतु नियमाप्रमाणे ७२ तासांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. या मार्गाचे यावर्षी नूतनीकरण सुरू आहे.
– हरीश चवरे, (निंभोरा बोडखा)
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






