कोल्हा ठरला ‘लबाड’; आता भरवसा मोरावरच

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असली तरी बंगालच्या उपसागरातून जो प्रवाह येत आहे, तो कमजोर असल्याने मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या मृगाचे वाहन कोल्हा होते. आता २१ जूनपासून आर्द्राला सुरुवात होत आहे व वाहन मोर असल्याने यामध्ये पेरण्या पूर्ण होतील, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे.

मान्सूनचा पाऊस येणार, या आशेवर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. अशा स्थितीत पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याची आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाने बुधवारी दुपारी दिली होती. त्याचे चार दिवस अगोदर रोज मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने किमान दोन हजार हेक्टरमध्ये कपाशीची लागवड झाली आहे.

गुरुवारपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस मात्र तुरळक ठिकाणीच झाला आहे. त्यामुळे जिरायती क्षेत्रात शेतकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान, २० जूनपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचा धोका असल्याने हंगामपूर्व कपाशीची लागवड करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते.

बीटीच्या ‘त्या’ वाणाचा तुटवडा दर्यापूर, अंजनगाव, भातकुली तालुक्यात मागणी असलेल्या बीटी कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ४७५ ग्रॅम पाकिटाची किंमत ८६४ रुपये असताना ते १८०० रुपयांपर्यंत विकले जात आहे. गुरुवारी कृषी विभागाने त्यावर कारवाई केली. असा प्रकार आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.

८० ते १०० मिमी पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. बीटी कपाशीच्या सर्व वाणांचे गुणधर्म व उत्पादन क्षमता सारखी असल्याने विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. घरच्या सोयाबीनची बीजप्रक्रिया व उगवण क्षमता तपासून वापरल्यास उत्पादन खर्च कमी होतो.

– राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!