अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला संपूर्ण राज्यभरात १९ जून रोजी सकाळी सुरुवात झाली. अमरावती ग्रामीण, अमरावती शहर व एसआरपीएफच्या आस्थापनेवरील जागांसाठी अमरावती शहरातील तीन स्वतंत्र मैदानावर बुधवारी उमेदवारांच्या मैदानी चाचणीस सुरुवात झाली. चाचणीच्या पहिल्याच दिवशी अकराशेंपेक्षा अधिक तरुणाई खाकी अंगावर चढवायचीच, या निर्धाराने धावताना दिसले. नोकरी मिळवायचीच, या स्वप्नपूर्तीसाठी सुरू झालेली उमेदवारांची धावाधाव’ आता सुमारे महिना-दीड महिना चालणार आहे.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अमरावती एसआरपीएफचे समादेशक राकेश कलासागर यांच्या नेतृत्वात या भरती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे तीनही आस्थापनांमधील एकुण ४९९ पदांसाठी तब्बल ५४ हजार ८३३ अर्ज आले आहेत. त्यांच्या मैदानी चाचणीस बुधवार १९ जूनपासून शहरातील तीन स्वतंत्र मैदानावर सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे,
ग्रामीण पोलिसांच्या वतीने आरएफआयडी’ म्हणजेच रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आरएफआयडी प्रणालीअंतर्गत पोलीस भरती प्रक्रियेत आरएफआयडी अॅक्लेट उमेदवारांच्या पायाला बांधल्या जातो. उमेदवार मैदानावर उतरल्यापासून मैदानाबाहेर निघेपर्यंत ते त्याच्या पायाला बांधलेले राहणार आहे. यामध्ये लागलेले सेंसर हे उमेदवार धावायला लागल्यापासून ते त्यानं आपले धावणे थांबवण्यापर्यंत त्याचा वेग आणि वेळ आपोआप दर्शवतो. शंभर किंवा सोळाशे मीटर धावल्यावर उमेदवाराने निश्चित केलेले अंतर पार करताच ही प्रणाली आपोआप थांबते. या उपकरणामधील संपूर्ण डाटा संगणकामध्ये सेव्ह राहणार आहे. अंतिम गुणावेळी ते पाहिले जाईल.
येथे झाली मैदानी चाचणीस सुरुवात शहर पोलिसांच्या आस्थापनेवरील पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर १९ जून रोजी सुरू झाली. तर ग्रामीण पोलीस आस्थापनेसाठी अर्ज भरलेल्यांच्या चाचणीस जोग स्टेडीयमवर सुरुवात आली. तर, सशस्त्र पोलीस दल एसआरपीएफ च्या मैदानी चाचणीस त्यांच्याच मैदानावर सुरुवात झाली आहे.
उमेदवारांसाठी बिस्कीट आणि केळीची व्यवस्था शहर आस्थापनेच्या भरतीसाठी हजारो युवक पहाटेच पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोहोचले. सर्व उमेदवारांसाठी बिस्कीट आणि केळीची व्यवस्था पोलिसांच्या वतीने केली. पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीनंतर त्यांची उंची आणि छाती मोजली जात आहे, छाती आणि उचीत भरणाऱ्या उमेदवारांना विशिष्ट क्रमांकाचा बिल्ला देऊन १०० मीटर धावणे आणि गोळाफेक या प्रक्रियेला उमेदवारांना समोर जावे लागत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







