वामनदादा कर्डक हेच आंबेडकरी गजलेचे उद्गाते: सुदाम सोनुले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आंबेडकरी गज़ल गायन आणि मुशायऱ्याचे ‘संबोधी’ चे दमदार आयोजन

अमरावती : समस्त काव्य प्रांतात गजलेचा एक विशिष्ट असा रुतबा आहे. फारशी, उर्दू, हिंदी असा प्रवास करत आलेली गज़ल मराठीतही आपले स्थान अधोरेखित करून आहे. सूफी संतांनी समाज परिवर्तनासाठी निर्मिलेल्या गज़लेचा फारसा अभ्यास न झाल्याने सर्वसामान्यांना ती प्रेमाकडे झुकलेली वाटते. म्हणूनच तिची प्रेमगीतासारखी बोळवण करण्यात आली. मात्र आंबेडकरी आंदोलनात सक्रिय असलेल्या वामनदादांनी मराठीत समाज परिवर्तनवादी आंबेडकरी गज़ल निर्माण केल्याचे अनेक पुरावे आहेत.

मराठी गजलेच्या  अभ्यासिकांनीही वामनदादाच्या गज़लांची दखल न घेतल्यामुळे मराठी गज़ल आशिक, माशुक, प्रेम, विरह या विषयातच मशगुल राहिली. परंतु गज़ल ही परिवर्तनवादी, विद्रोही तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्य घेऊन लिहिली जाते हे वामनदादाच्या गज़लांनी सिद्ध केले. बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा वसा घेऊन वामनदादांनी गज़लांची निर्मिती केली. तिलाच आंबेडकरी जाणिवेची ‘आंबेडकरी ग़ज़ल’ असे आपण मानतो. म्हणूनच वामनदादा कर्डक हेच आंबेडकरी गज़लेचे उद्गाते ठरतात. असे मत प्रतिपादन संबोधी डॉ. आंबेडकर स्टडी सर्कलचे सुदाम सोनुले यांनी केले. ते वामनदादा कर्डकांच्या 102 व्या जयंतीनिमित्त ‘संबोधी’ डॉ. आंबेडकर सभागृह भीम टेकडी येथे आयोजित आंबेडकरी ग़ज़ल गायन आणि मुशायरा या कार्यक्रमाची भूमिका मांडताना बोलत होते.

Ambedkari ghazal

यावेळी आंबेडकरी मुशायऱ्याचे अध्यक्ष गझलकार प्रमोद वाळके, संबोधी चे अध्यक्ष नारायण थोरात, सिद्धार्थ गेडाम, गणेश थोरात, गोपाल मोहन, संजय मोखडे, मोरेश्वर चोखांन्द्रे, उमेश सहारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या गज़ल मुशायऱ्यात प्रा. संजय घरडे, डॉ. नंदकिशोर दामोदरे, देवीलाल रौराळे, रोशन गजभिये, गणेश लांडगे, विनोदकुमार बागडे, अनिल अघम, प्रेमानंद भगत, सुदामजी सोनुले यांनी आपल्या आंबेडकरी गज़ल सादर केल्यात. मुशायऱ्याचे सूत्रसंचालन वर्धा रेडिओचे निवेदक जगदीश भगत यांनी केले.

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात झालेल्या आंबेडकरी गज़ल गायनात रामटेक (नागपूर) येथील आंबेडकरी गज़ल गायक संजय कुमार मेश्राम यांनी वामनदादा कर्डक यांच्या गज़लांसह स्थानिक गझलकार प्रा. संजय घरडे, सुदामजी सोनुले, डॉ. नंदकिशोर दामोदरे यांच्या गज़ल गाऊन प्रेक्षक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या गझल गायनाच्या साज-संगतीला तबलावादक श्याम रंगीला (नागपूर) कीबोर्ड प्लेयर सचिन गुडे, आक्टोपॅड निलेश गायकवाड, बासरी वादक चेतन वानखडे, यांनी साथ केली. दमदार सादरीकरण आणि सुमधुर साग्र संगीताने उपस्थितांनी गज़लांचा मनमुराद आनंद लुटला. या मैफिलीचे सूत्रसंचालनही जगदीश भगत यांनी केले.

कार्यक्रमात आंबेडकरी ग़ज़ल गायक संजय कुमार मेश्राम यांचा शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर अमरावतीमध्ये प्रथमच वामनदादांच्या गज़लांचे सादरीकरण केल्याबद्दल प्रमोद वाळके, प्रा. संजय घरडे, रवींद्र गवळी, प्राचार्य डॉ. कमलाकर पायास, डॉ. वामन गवई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन संजय कुमार मेश्राम यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. संजय घरडे यांच्या शब्दांकनातून साकारलेल्या सन्मानपत्राचे वाचन जगदीश भगत यांनी केले. कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, आंबेडकरी गज़लकार, कवी साहित्यिक, विचारवंत तथा बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013613
error: Content is protected !!