
छत्रपती संभाजीराजे चौक येथील शहर बस थांबा सेवेचा थाटात शुभारंभ
अमरावती :-कधीकाळी हॉटेल -ढाबांचा चौक अशी ओळख असलेला नवसारी रिंगरोड चौक आज छत्रपती संभाजी महाराज चौक म्ह्णून नावारूपास आला आहे. या चौकातून वाढती वर्दळ लक्षात घेता नवसारीपर्यंतची शहर बस सेवा आता संभाजी राजे चौकापर्यत विस्तारित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी येथील शहर बस थांबा सेवेचा शुभारंभ अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे आता अमरावती महानगर पालिकेची शहर बस सेवा जुन्या नवसारी थांबा वरून पुढे छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत सुरु झाली आहे. यावेळी आमदार महोदयांनी नामफलकाचे अनावरण करून व फीत कापून शहर बस थांबा सेवेचा शुभारंभ केला.
याप्रसंगी पुढे बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले की, नवसारी प्रभागवासीयांच्या स्थानिक गरजा व मागणी लक्षात घेता या परिसरामध्ये पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यावर आपला विशेष भर राहिला आहे. परिसरातून मोठी वाहतुकीची वर्दळ असल्याने रस्ता चौपदरीकरण करण्यात आले आहे. आता स्थानिक नागरिकांना सुरक्षित प्रवास व अपघातविरहित परिवहनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मनपाच्या शहर बस सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. यातून विद्यार्थी, महिला , जेष्ठ नागरिक तसेच कामगार व नोकरदार वर्गाला सुविधा मिळाली असून त्यांच्या दैनंदिन जीवनात गतिमानता आली असल्याचे मनोगत आमदार महोदयांनी व्यक्त केले.
नवसारी परिसराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने स्थानिक भागातील नागरिकांना शहरात जाण्यासाठी शहर बस सेवेचे माध्यम आहे. आधी नवसारी स्टॉप पर्यंत बस सेवा होती, आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने आता छत्रपती संभाजी राजे चौकापर्यंत सेवेचा विस्तार होऊन शहर बस थांबा सुरु झाल्याने स्थानिक नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध झाली असल्याचे मनोगत माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अंती ऋतुराज राऊत यांनी संर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

दरम्यान आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या समवेत स्थानिक प्रवाश्यांनी “आमची परिवहन मनपा शहर बस “मध्ये प्रवास करून प्रवासाचा आनंद लुटला. यावेळी स्थानिक नागरिक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






