
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर/अंजनगाव सुर्जी
बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र देश व समाजाच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असलेल्या सैन्य दलातील जवान व पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर येथील विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष दर्यापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा सण साजरा केला.
सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. त्यामुळे यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा, अशी संकल्पना मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी मांडली. या उपक्रमात कल्पना चावला गाईड क्लब तसेच
शाळेतील सर्व विद्यार्थिनी व शिक्षिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आज सकाळी नऊ वाजता स्काऊट गाईड कॅप्टन (पर्यवेक्षिका) ज्योतीताई बांबल यांनी विद्यार्थिनी व शिक्षिकांसह पोलीस ठाणे गाठले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे, उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधल्या. विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना भारावले होते. पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांनी सर्व विद्यार्थिनींनी पेन भेट दिले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी शाळेतील गाईड क्लब च्या विद्यार्थिनींनी व शाळेतील इतर विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक मनोज देशमुख सर व उप मुख्याध्यापक धोटे मॅडम तसेच शाळेतील इतर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






