
अमरावती : जिल्ह्यात वातावरण बदलामुळे विविध आजारांचा विळखा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कीटकजन्य आजाराबरोबरच साथरोगही वाढले आहेत. कोरोनाने पुन्हा एकदा जिल्ह्यात एंट्री केली असून, मागील दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. कोरोना, तसेच स्वाइन फ्ल्यूच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क असून, कोरोना किंवा स्वाइन फ्ल्यूची लक्षणे दिसताच रुग्णांनी तपासणी करण्याचे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, याबरोबर आजारांचेही प्रमाण वाढले आहे. हवामानातील बदल हा साथरोग, तसेच कीटकजन्य आजार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील वॉर्ड हे हाऊसफुल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे साथरोग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहे. अशातच जिल्ह्यात १ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीमध्ये ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदही आरोग्य विभागाने केली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या संशयित रुग्णांचे अहवाल तपासण्यात व्हेरियंटची लक्षणे असलेल्या रुग्णांचे अहवाल हे पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेला वेळीच उपाययोजना राबविण्याचे, तसेच कोरोना चाचणी वाढविण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी दोन स्वतंत्र वॉर्डची निर्मितीदेखील केली आहे.
मनपा क्षेत्रातील २५ रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण ३७ रुग्णांपैकी २५ रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील आहेत, तर १२ रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये काही रुग्णांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून, त्यांना सुट्टीदेखील देण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने नागरिकांनी सजगता पाळावी, मास्क देखील वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






