
अमरावती : दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याअनुषंगाने महायुती, महाविकास आघाडीसह इतरही राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू व्हायची असली तरी महायुतीतून अमरावती विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याचे संकेत आहेत; मात्र अमरावती हा भाजपलाच हवा, अशी आक्रमक भूमिका पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे मांडल्याची माहिती आहे. मोर्शी सुद्धा भाजपलाच पाहिजे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गत दोन दिवसांपूर्वी करण्यात आली, हे विशेष.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. २१) बडनेरा मार्गालगतच्या ‘मान सरोवर’ येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल, विदर्भ संघटन डॉ. उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने हजर होते. या बैठकीला प्रमुख कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते जाणून घेण्यात आली. या बैठकीत अमरावती मतदारसंघात उमेदवारीवरून प्रचंड खल झाले. महायुतीतून अमरावती मतदारसंघ हा भाजपच्याच वाट्याला हवा. सक्षम आणि लोकाभिमुख चेहरा असलेला उमेदवार भाजपकडे असल्याचा दावा करण्यात आला. अमरावती हे विभागीय केंद्र असून, परंपरागत भाजपचा अमरावती मतदारसंघ हा हक्काचा आहे. त्यामुळे अमरावती विधानसभेची जागा ही भाजपलाच मिळावी, असा हट्ट यावेळी वरिष्ठांपुढे धरला गेला. किंबहुना वरिष्ठांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता अमरावती विधानसभेचा निर्णय घेतल्यास लोकसभेसारखे परिणाम पक्षाला भोगावे लागतील, अशी रोखठोक भूमिका भाजपजनांनी घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. हा प्रकार होत नाही तोच दोन दिवसांनी शुक्रवारी (दि. २३) भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत लोहाना महाजन वाडी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली. या बैठकीला सुद्धा भाजपचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यात अमरावती विधानसभेची जागा ही भाजपलाच मिळावी, अशी आग्रही भूमिका अनेकांनी येथेही घेतली. अमरावती हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कार्यकर्त्यांची मजबूत फळी असून, सक्षम उमेदवार भाजपकडे असताना ‘आयाराम’ कशाला? असा सवाल बावनकुळे यांच्या पुढ्यात उपस्थित केला. दरम्यान, १० ते १५ कार्यकर्त्यांनी आ. बावनकुळे यांना अमरावती मतदारसंघावरून जाब विचारत जणू त्यांना घेराव केल्याचे चित्र निर्माण झाले होते.
विधानसभेच्या तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. त्याअनुषंगानेच २१ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात अमरावती विधानसभेबाबत चर्चा झाली. अमरावती हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. ही जागा भाजपलाच मिळावी, अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांची आहे. वरिष्ठांना तसे कळविले आहे.अमरावतीतून कधीही एनसीपी निवडून आलेली नाही.
शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्त्ते भाजप
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






