
यश रोडगे खून प्रकरण : ‘त्या’ गँग सदस्यांवर पोलिसांचा वॉच
अमरावती : गुरुवारी सकाळी गोपालनगर येथील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर शुक्रवारी दुपारी न्यायालय परिसरात जमाव करून आरोपींपैकी कुणाचा तरी ‘गेम’ करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांच्या सतर्कतेने फसला. त्यापुढे जाऊन यश रोडगे समर्थकांनी शनिवारी मुख्य आरोपी तक्षदीप इंगळे याच्या पार्वतीनगर स्थित घरावर दगडफेक केली. तर शनिवारी दुपारी रोहित मांडळे खून प्रकरणी कारागृहात असलेल्या समीर डोंगरे याच्या बेलपुरास्थित घरात शिरून चार ते पाच जणांनी धुडगुस घातला.
गेल्या तीन दिवसांपासून मृत यश रोडगेचे युवा समर्थक वा गँगमधील सदस्य त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींच्या घराजवळ घुटमळत असल्याचे चित्र आहे. यश रोडगे (१८, गोपालनगर) याचे २१ ऑगस्ट रोजी अपहरण करून त्याचा तलवार व चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्याचा मृतेदह गुरुवारी पहाटे सुकळी कंपोस्ट डेपो रोडवर आढळून आला. अंकुश मेश्राम ऊर्फ लावाचा खून तूच केला म्हणत २१ ऑगस्ट रोजी रात्री १०च्या सुमारास यशवर आधी चांडक नाष्टा सेंटरजवळ तलवार व चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याला रक्तबंबाळ स्थितीत लावा मेश्रामच्या म्हाडा कॉलनी स्थित घरी नेण्यात आल्याची चर्चादेखील झडली. मात्र, पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही. यश रोडगेसोबत असलेल्या आकाशने ती माहिती राजापेठ पोलिसांना दिली. सर्चिगनंतर गुरुवारी पहाटे यशचा मृतदेह आढळला. यशची हत्या झाल्याचे समजताच समर्थकांनी गुरुवारी सकाळी गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ यथेच्छ धुमाकूळ घातला होता. तूर्तास यश रोडगेच्या घराच्या परिसरातदेखील बंदोबस्त तैनात आहे. याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनदेखील ताब्यात आहेत. यातील श्री काटे हा फरार आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे पोलिसांना मिळाली असून, वाहनांचे सर्चिग सुरू आहे.
कोर्ट परिसरात धुमाकूळ, मृताच्या भावावरही गुन्हा २३ ऑगस्ट रोजी दुपारी राजापेठ पोलिस दोन आरोपींना घेऊन न्यायालयात गेले असता, तेथे मृत यशचा मोठा भाऊ विजय विलास रोडगे व इतर १० ते १५ इसम त्या परिसरात जमाव करून थांबले होते. पोलिस अंमलदार दिनेश भिसे यांनी ती माहिती राजापेठ ठाणेदारांनी दिली. त्यामुळे तेदेखील स्टाफसह कोर्ट परिसरात पोहोचले. पोलिसांना पाहताच काही जण पळून गेले, तर चार जण पोलिसांच्या हाती लागले. त्यात विजय रोडगे (२५, रा. गोपालनगर), यश दिनेश भटकर (२२, गोपालनगर), रोशन सुभाष खानजोडे (२०, रा. यशोदानगर) व अमोल सतीश देशमुख (१९, रा. महेंद्र कॉलनी) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत २४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






