
अमरावती : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या मार्गावर अमरावती शहरानजीक रहाटगावजवळील गौरी इन हॉटेलजवळ असलेल्या उड्डाणपुलाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून, अनेक ठिकाणी तडे गेले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत रविवारी खासदार बळवंत वानखडे यांनी उड्डाणपुलाची केली. त्यानंतर त्वरेने सोमवारी युद्धस्तरावर डांबरीकरणाची कामे करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांतच पुलाला तडे गेले आणि डांबरीकरणाची कामे उखडल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाच्या कामांचा दर्जा कसा आहे, हे दिसून येते.

अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर रहाटगावनजीक उड्डाणपुलाची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाच्या नियंत्रणात करण्यात आली आहे. या ठिकाणी डांबरीकरण कामाचा दर्जा नसल्याचा आक्षेप खासदार वानखडे यांनी घेतला आहे.
एवढेच नव्हे, तर या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. या पुलाच्या कठड्यावरील भिंतीला तडे गेले तर उड्डाणपुलावरील रस्त्याला तडे जाऊन रस्ता दबला असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता या उड्डाणपुलावर निर्माण झाली आहे.
त्यामुळे या कामाची चौकशी करून नव्याने पुन्हा पूल व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.
रहाटगाव येथे उड्डाणपुलाला तडे गेल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेण्यासाठी रविवारी या पुलाची पाहणी केली. रस्ते निर्मितीसह पुलाच्या बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याबाबत तक्रार केली जाणार आहे.
– बळवंत वानखडे, खासदार, अमरावती
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






