जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी, वीस हजार कारागीर देशभरातुन येणार
वृत्तसंकलन z24news.dreamhosters.com
वर्धा : केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. शिवाय १२ बलुतेदारांची कारागिरांच्या वस्तूंची प्रदर्शनी या ठिकाणी लागणार आहे. महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीतून देशातील कारागिरांना संदेश देण्याकरिता या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. १९ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथे येणार आहेत.
मागील वर्षी या योजनेची सुरुवात १७ सप्टेंबरला दिल्ली येथे करण्यात आली होती. भारतातून या कार्यक्रमाला वीस हजार कारागीर येणार असल्याची माहिती आहे. या
कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन जय्यत तयारीला लागले आहे. शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानात २ लाख वर्ग फुटाचा भव्य डोम उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी ४० हजार व्यक्तींची बसण्याची व्यवस्था करण्यात येईल.
सध्या मैदानावरती पावसाळ्यामुळे गवत व काही झाडे उगवलेली आहेत. त्याची साफसफाई सुरू आहे. हेलिपॅडकरिता लोक महाविद्यालयाचे मैदान अधिग्रहीत करण्यात आले. मैदानातून स्वावलंबी मैदानाकरिता सभास्थळावर येण्यासाठी रस्ते करण्यात येणार आहे. जेसीबीद्वारे जागा साफ करण्याची तयारी सुरू आहे. आवश्यक ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. चारही बाजूला सुरक्षा कडे बांधण्यात येणार आहे. स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानाच्या परिसरामध्ये अनेक मोठमोठी झाडे आहेत. पर्यावरणाचे रक्षण करूनच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल. कार्यक्रमाकरिता कोणत्याही प्रकारचे झाड तोडले जाणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश मोकलकर यांनी दिली.
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मैदानावर पोलीस छावणी लावलेली आहे. २४ तास काही पोलिस तैनात करण्यात आले. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेत बारा बलुतेदारांच्या कारागिरांच्या प्रदर्शन येथे उभारण्यात येणार आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. विविध प्रकारच्या वस्तूंची प्रदर्शनी येथे तीन दिवस असणार आहे. राज्यात एक महिन्यानंतर निवडणुकीचे वारे लागतील. त्यापूर्वी विदर्भात पंतप्रधानांची ही पहिली जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधानांच्या आगमनाने जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






