
तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शेंदूरजनाघाट नगर परिषदेकडून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासोबतच नळावाटे मासोळीही पुरविली जात आहे का, असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जात आहे. ‘स्वच्छ शहर’ म्हणून शेंदूरजनाघाट शहराला स्वच्छ भारत अभियानात राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात संसर्गजन्य आजारासह नळावाटे घरोघरी येणारे पाणी दूषित व गढूळ येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यातच मलकापूर परिसरातील वैभव दरवई यांच्या घरी नळाच्या पाण्यातून चक्क मासोळी आली. ही वार्ता पसरताच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. दूषित पाण्याने अनेक आजार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच्या भावना शहरवासीयांमधून व्यक्त होत आहेत. तेथे ८० कोटी रुपये खर्चुन पाइपलाइनचे जाळे टाकण्यात आले. फिल्टर प्लान्ट तयार झाला. तरीही दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







